धान खरेदीदरम्यान येणा-या अडचणी व समस्या वेळीच मार्गी लावा

216
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

गोंदिया – शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदी करताना शेतक-यांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी घ्या़ धान विहित वेळेतच खरेदी केले़ जावे याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी, शेतक-यांकडून धान खरेदीदरम्यान येणा-या अडचणी व समस्या संबंधित यंत्रणांनी वेळीच मार्गी लावाव्यात, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकीत खा़ प्रफुल्ल पटेल यांनी केल्या़ पूर्व विदर्भात धान खरेदी करताना अभिकर्ता संस्था, तसेच शेतक-यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ या समस्या मार्गी लावण्याच्या अनुषंगाने खा़ प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयात विशेष बैठक घेण्यात आली़ या बैठकीत धान खरेदी केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली़ दरम्यान, तूर्त कॅमेरे लावण्याची गरज नसल्याचे अधिका-यांनी सांगितले़ बारदान्याचा अभाव असल्याची माहिती अधिका-यांनी बैठकीत दिली़ यावर भुजबळ यांनी बारदाना पर्याप्त प्रमाणात उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले़
धान खरेदी करताना बारदान्यावर टॅग लावण्याची प्रक्रिया आहे़ मात्र, हे टॅग लावण्याची गरज नाही़ मशीनने बारदाना शिवण करण्याचे काम गरजेचे नाही अशा सूचना यावेळी केल्या़ मागील वर्षी मोठ्या प्रमाणात धान खरेदी केंद्रावर धानाची नासाडी झाली होती़ याबाबत उपाययोजना करुन यंदा खरेदी करण्यात येणारे धान सुरक्षित राहण्याच्या अनुषंगाने कारवाई करावी असे निर्देश बैठकीत दिले़ बैठकीला आ़ मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे सचिव विजय वाघमारे, महाराष्ट्र राज्य सहकारी व पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, दूरदृश्यप्रणालीव्दारे महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संंचालक दीपक सिंघला, जिल्हाधिकारी नयना गुंडे, भंडाºयाचे जिल्हाधिकारी संदीप कदम, बाजार समितीचे लोमेश वैद्य, प्रवीण बिसेन, रेखलाल टेंभरे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी उपस्थित होते़

धान खरेदी करणा-या अभिकर्ता संस्थांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले़ खा़ प्रफुल्ल पटेल यांनी नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात धान खरेदी वेळेत केली जावी़ धान साठवणुकीसाठी गोदामांची आवश्यकता आहे़ त्या ठिकाणी धानाच्या साठवणुकीचा प्रश्न सोडवावा शेतक-यांची कोणत्याही धान केंद्रावर गैरसोय होणार नाही याची काळजी संबंधित यंत्रणांनी घेण्याच्या सूचना खा़ प्रफुल्ल पटेल यांनी केल्या़