अमरावतीत झालेल्या हिंसाचारनंतर उपराजधानीत ‘हायअलर्ट’!

150
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – अमरावतीत झालेल्या हिंसाचार आणि गडचिरोलीत झालेली मुठभेट या घटनेनंतर नागपूरसह आजूबाजूच्या शहरांमध्ये सर्व ठिकाणी सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे़ शहर, नागपूर आणि गडचिरोली रेंजच्या सुरक्षाव्यवस्थेचे मार्गदर्शन करण्यासाठी आलेले एडीजी वाहतूक प्रमुख डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी रविवारी परिस्थितीचा आढावा घेतला़ कुठलीही अनुचित घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून गुन्हेगार व अफवा पसरवण्यासाठी चर्चेत असलेल्या लोकांवर नजर ठेवली जात आहे़ अमरावतीत झालेल्या घटनेनंतर सर्व जिल्ह्यांना हायअलर्टवर ठेवण्यात आले आहे़ दंग्यासाठी चर्चेत असलेल्या शहरांमध्ये अतिरिक्त दक्षता बाळगली जात आहे़ अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या अधिका-यांना वेगवेगळया आयुक्तालय व रेंजची जबाबदारी सोपवण्यात आली आहे़
डॉ. उपाध्याय यांच्याकडे शहर, नागपूर व गडचिरोली रेंजची जबाबदारी आहे़ डॉ. उपाध्याय यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांसह विदर्भात अनेक पदांवर काम केले आहे़ ते शनिवारी सायंकाळीच नागपुरात पोहोचले़ त्यांनी रविवारी दुपारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त अश्र्वती दोर्जे, आयजी रेंज छेरिंग दोर्जे आणि ग्रामिणचे अधीक्षक विजय मगर यांच्याशी सुरक्षेवर चर्चा केली़ अधिका-यांना संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढविण्यासह पोलिस कर्मचा-यांना तैनात करण्यासही सांगण्यात आले़ शहर आणि नागपूर रेंजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर  डॉ. उपाध्याय गडचिरोलीला रवाना झाले़ तिथे पोलिस चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेल्याने नक्षलवाद्यांकडून हिंसाचार होण्याची शक्यता आहे़
नागपूर शहरात पोलिसांनी शनिवारी दुपारपासूनच मोर्चा सांभाळला आहे़ रविवारी सायंकाळीसुध्दा सर्व झोनमधील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी रुट मार्च केला़ कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवणे आणि अफवा पसरविणा-यांची लगेच माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे़ शहरामध्ये नाकाबंदीसह सर्व संवेदनशील सशस्त्र पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे़ सर्व समाजातील नेत्यांशी चर्चा करुन त्यांना पोलिसांना मदत करण्याची विनंती करण्यात आली आहे़ पोलीस अधिकारी कर्मचा-यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत़ अफवा पसरविण्यात तसेच प्रतिबंधित संघटनांशी संबधित असलेल्या लोकांवर नजर ठेवली जात आहे़ यासाठी गुप्तहेर पोलिस कर्मचा-यांना तैनात करण्यात आले आहे़