विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
नागपूर- नागपूर येथील बेलतरोडी ठाण्याच्या परिसरात बँक मॅनेजरला ६.९० लााखाचा फटका बसण्याची घटना उघडकीस आली आहे़ रंजितकुमार वर्मा, बेलतरोडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियात मॅनेजर आहे़ त्यांना १० नोव्हेंबरला अज्ञात व्यक्तीने फोन केला़ त्याने आपण ताजश्री ऑटो व्हिल्स प्रा़. लिमिटेडचा संचालक असल्याचे सांगितले़ त्याने मेडीकल इमर्जन्सी असल्याची बतावणी करुन वर्मा यांना हिंमाशू चौधरी नावाच्या व्यक्तीच्या खात्यात ६ लाख ९० हजार ६७० रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले़ त्याने चेक देण्यास असमर्थता दाखवून हिमांशू चौधरीच्या खात्यात आरटीजीएस करण्यास सांगितले़ वर्माने आरोपींना अर्ज ई-मेल करण्यास सांगितले़ त्यावर आरोपीने वर्मा यांना ई-मेल पाठविल्याचे सांगितले़ परंतु, नेटवर्कची समस्या असल्यामुळे ई-मेल डिलिव्हर होत नसल्याची बतावणी केली़ आरोपीने वर्मा यांना व्हाँट्सअँपवर बनावर ताजश्री आँटो व्हिल्स प्रा़ लि़ चा बनावट अर्ज पाठविला़ त्याआधारे वर्मा यांनी हिमांशू चौधरीच्या खात्यात ६ लाख ९० हजार ६७० रुपये ट्रान्सफर केले़ पैसे ट्रान्सफर केल्यानंतर वर्मा यांना आपली फसवणूक झाल्याची शंका आली़ त्यांनी त्वरित बँकेला सूचना देउन हिमांशू चौधरीच्या खात्यातून रक्कम न देण्यास सांगितले़ परंतु, तोपर्यंत कथित हिमांशू चौधरीने पैसे काढले होते़
वर्मा यांनी ताजश्री आँटो व्हिल्स प्रा़ लि़ च्या संचालकांची चौकशी केली असता त्यांनी फोन आणि पैसे ट्रान्सफर केल्यास सांगितले नसल्याची माहिती दिली़ त्यानंतर, वर्मा यांनी बेलतरोडी पोलिसात तक्रार दाखल केली़ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ पोलिस फोन करणारे, हिमांशू चौधरीचा शोध घेत आहेत़ बँक अधिका-याच्या भूमिकेमुळेही पोलिस चक्रावले आहेत़

