Home नागपूर नेत्यांची परीक्षा येणा-या विधान परिषदेच्या निवडणूकीत !

नेत्यांची परीक्षा येणा-या विधान परिषदेच्या निवडणूकीत !

12 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल

नागपूर – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूर विधान परिषदेची निवडणूक म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांची परीक्षा समजली जात आहे. पदवीधर आणि जिल्हा परिषदेची पोट निवडणूक जिंकणारी काँग्रेस उत्साहात तर भाजप सावधपणे पावले टाकत आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे अद्यापही उघड झालेली नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सगळ्यांचाच कस लागणार आहे.भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार गेल्या वेळी या मतदारसंघातील निवडणूक अविरोध झाली होती आणि भाजपचे गिरीश व्यास विजयी झाले होते. यावेळी भाजपकडे मते अधिक असली तरी गेल्यावेळी होता तसा सत्तेचा प्रभाव नाही. तो काँग्रेसकडे आहे. भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात सामंजस्य होईल, अशी स्थिती सध्या नसल्याने सगळेच जण निवडणुकीच्या तयारीस लागले आहेत.

भाजपकडून प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, उपाध्यक्ष संजय भेंडे आणि नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांची नावे चर्चेत आहेत. यानंतरही अन्य इच्छुकही सक्रिय झाले आहेत. काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र, यावेळी दावा करून आगामी काळातील मार्ग सुकर करावा, असा विचार करणाऱ्या इच्छुकांनी सज्ज होण्याची तयारी सुरू केली.भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. पशुसंवर्धन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार व राजेंद्र मुळक यांची रवीभवनात बैठक झाली. नगरपालिकांच्या निवडणुकांसोबतच विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत प्राथमिक चर्चा झाली.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असून येत्या दोन दिवसांत उमेदवाराची घोषणा होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. भाजप उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, अधिकृत घोषणा नंतर केली जाणार असल्याचे समजते. उमेदवारीसाठी नव्याने मोर्चेबांधणी करणाऱ्यांनी मतदारांचे विश्लेषण करून जमवाजमव सुरू केली. तसेच, नेत्यांकडेही इच्छा व्यक्त केली आहे.नागपूर जिल्ह्यात ६१४ मतदार आहेत. महापालिकेत १५१ सदस्य, जिल्हा परिषदेत ५८ सदस्य, नगरपरिषदांमध्ये ३०४ आणि ३७ मनोनीत सदस्य आहेत. याआधारे प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत सुमारे ६० मतदार अधिक असल्याचा भाजपचा दावा काँग्रेसलाही मान्य आहे. मात्र, महाआघाडीची सत्ता आणि पदवीधर मतदारसंघात भाजपचा केलेला पराभवाने काँग्रेस नेत्यांचा विश्वास उंचावला आहे. अल्पसंख्याबळ असणारे बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकनसह अन्य स्थानिक आघाड्यांचा कल कसा राहतो, याकडेही लक्ष लागले आहे