महाल परिसरात पैशाच्या वादात कमलेश ठार

200
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर – महालमधील नरसिंग टॉकीज परिसरात घडलेले हत्याकांड पैशाच्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. कोतवाली पोलिसांनी या हत्याकांडाचा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे़. सागर राजू वासनिक (वय २२, रा. जुना बगडगंज) आणि भारत राजू राऊत (वय २२, रा. संजय गांधीनगर), अशी हत्याकांडातील आरोपींची नावे आहेत़. कमलेश कृष्णाजी गिरडे (वय २२, रा. एकतानगर, पारडी), असे मृतकाचे नाव आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश हा कुटुंबापासून वेगळा राहायचा. तो महालमधील फुटपाथवर झोपायचा. याच परिसरातील सुलभ शौचालयात सागर हा काम करतो. दोघे एकमेकांना ओळखायचे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी कमलेश याने शौचालयाजवळ ठेवलेल्या गल्ल्यातील पैसे काढले. सागरने त्याला पैसे परत मागितले असता त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे सागरने कमलेशसोबत वाद घातला. सागरने भारत याच्या मदतीने कमलेशच्या हत्येचा कट आखला. याच दिवशी रात्री दोघांनी कुदळीने वार करून कमलेशला ठार मारले. त्यानंतर दोघेही पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. कमलेशच्या हत्येनंतर सागर हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शोध घेऊन आधी सागर व नंतर भारतला अटक केली. दोघांची ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.