Home नागपूर नगरसेवकांच्या संख्येत वाढ, नागपूर शहाराला मिळणार ५ नगरसेवक

नगरसेवकांच्या संख्येत वाढ, नागपूर शहाराला मिळणार ५ नगरसेवक

0
नगरसेवकांच्या संख्येत वाढ, नागपूर शहाराला मिळणार ५ नगरसेवक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

नागपूर : मागील काही वर्षांत लोकसंख्या वाढल्याने राज्यातील महापालिका, नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार नागपूर शहाराला नवीन ५ नगरसेवक मिळणार आहेत. त्यामुळे, मनपातील नगरसेवकांची संख्या संख्या १५१ वरून १५६ पर्यंत वाढणार आहे. विशेष म्हणजे, २० नगरसेवक वाढणार अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मागील काही वर्षांत झपाट्याने वाढलेली लोकसंख्या व त्यानुसार विकास योजनांना गती मिळावी, यासाठी महापालिका व नगर परिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सध्या नागपूर महापालिकेत १५१ नगरसेवक आहेत. २०११ च्या जनगणनेच्या आकडेवारीच्या आधारावर महानगरपालिका व नगर परिषदांमधील सदस्य संख्या निर्धारित आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२१ च्या जनगणनेचे निष्कर्ष अप्राप्त आहेत. त्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. या कालावधीत लोकसंख्या वाढीचा सरासरी वेग गृहित धरून अधिनियमात नमूद केलेल्या महापालिका व नगर परिषदांच्या किमान सदस्य संख्येत १७ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. किमान सदस्य संख्या वाढविल्यामुळे पुढील सदस्य संख्यादेखील वाढेल व त्यामुळे पर्याप्त सदस्य संख्या निश्चित होईल.

महानगरपालिकांमध्ये तीन लाखापेक्षा अधिक व सहा लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ७६ व अधिकतम संख्या ९६ पेक्षा अधिक नसेल. सहा लाखापेक्षा अधिक व १२ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ९६ व अधिकतम संख्या १२६ पेक्षा अधिक नसेल. १२ लाखापेक्षा अधिक व १४ लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १२६ व अधिकतम संख्या १५६ पेक्षा अधिक नसेल. २४ लाखापेक्षा अधिक व ३० लाखापर्यंत लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १५६ व अधिकतम संख्या १६८ पेक्षा अधिक नसेल. ३० लाखापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या १६८ व अधिकतम संख्या १८५ पेक्षा अधिक नसेल.