Home Breaking News मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेचा शुभारंभ

मनपाच्या ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेचा शुभारंभ

128 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर
  • सोमय्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घेतली लस

चंद्रपूर  : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थायी लसीकरण केंद्रांसोबतच शहराच्या विविध भागात जाऊन राबविण्यात येत असलेल्या ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला देखील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच मालिकेमध्ये मंगळवार, दिनांक २६ ऑक्टोबरपासून सोमय्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड-१९ लसीकरण’ मोहिमेचा शुभारंभ उपमहापौर राहुल पावडे यांनी फित कापून केला.

यावेळी महापालिका आयुक्त राजेश मोहिते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी व डॉ. अश्विनी येडे आणि सोमय्या पॉलिटेक्निकचे मुख्याध्यापक प्रा. मोहम्मद जमीर शेख यांची उपस्थिती होती.

शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षावरील सर्व विद्यार्थी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड-19 चे लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालयात  मिशन युवा स्वास्थ्य  मोहीमेअंतर्गत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 

महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांना महाभारतातील कर्णाच्या गोष्टीविषयी विचारले. महारथी कर्णाच्या अभेद्य कवचकुंडलांचा दाखला विद्यार्थ्यांना देत पात्र असणाऱ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासकीय क्षेत्र, सेवा क्षेत्रात काम करण्यास आणि स्वयंपूर्ण उद्योजक होण्यास उपयोगी पडतील, अशा क्षमता व कौशल्ये स्वतःमध्ये विकसित करण्याचा उपयुक्त सल्ला देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
 
तत्पूर्वी उपमहापौर राहुल पावडे यांनी आपल्या संबोधनात महापालिकेने कोरोना काळात तसेच लसीकरण मोहीमेच्या यशस्वीतेसाठी केलेल्या कामगिरीचा संक्षिप्त आढावा घेतला. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण अद्याप बाकी असल्याचे सांगत युवा लसीकरण मोहिमेचा लाभ घेत लसीकरण करून घेण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले. यावेळी डॉ. गर्गेलवार, डॉ. भारत, डॉ. चटकी व डॉ. येडे यांनीही आपल्या उपस्थित सोमय्या पॉलिटेक्निकचे विद्यार्थी, तसेच शिक्षक व कर्मचाऱ्यांना देखील लसीकरणाचे आवाहन केले.१८ वर्षावरील सर्व नागरिकांनी मोफत कोविड-१९ लसीकरण करून घेत संभाव्य तिसऱ्या लाटेपासून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.