Home Breaking News मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर यांचा पदग्रहण सोहळा

मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान,नागपूर यांचा पदग्रहण सोहळा

73 views
0
विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर :-
“मराठी साहित्य संस्थेचा असा अभुतपूर्व कार्यकारीणी 
पदग्रहण सोहळ
मी यापूर्वी कदापीही पाहिलेला नाही “
मा.शुभांगीताई भडभडे
“मराठी साहित्यिक संस्थेच्या
कार्यकारिणीच्या पदग्रहणाचा असा देखणा सोहळा मी आजपर्यंत कधीही अनुभवलेला नाही. नियोजना मागे असलेली  कल्पकता आणि विजया मारोतकर यांचे उत्तम संघटन याचा प्रत्यय येत आहे “
असे उदगार कार्यक्रमाच्या अध्यक्ष, सुप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगीताई भडभडे यांनी काढले.माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कार्यकारिणी पदग्रहण समारंभात त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या .यावेळी मंचावर विशेष अतिथी सुप्रसिद्ध कथाकार श्रीकांतजी गोडबोले, माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या प्रा.विजया मारोतकर ,
विशाल देवतळे आणि प्रभाकर तांडेकर उपस्थित होते. मा.शुभांगीताई भडभडे पुढे म्हणाल्या की,-‘ मराठी साहित्यात स्वत:ची मुहूर्तमेढ रोवताना भक्कम पाया निर्माण केल्यानंतर एखादी संस्था स्वतःची कार्यकारिणी घोषित करते. प्रत्येकाला प्रतिज्ञा देते, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करते आणि बॅच लावून कर्तव्याची जाणीव करुन देते.असे काही मी आजवर कुठेही पाहिलेले नाही.
अतिशय जाणीवपूर्वक केलेले हे नियोजन,या करिता वापरलेली कल्पकता, सर्व कार्यकर्त्यांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता अशीच संस्था मराठी करिता काहीतरी भरीव काम करणार याची मला पक्की खात्री  वाटते. मी त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा  देते “.
शीला बीडकर यांच्या सुरेल आवाजातील स्वागत गीतानंतर पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या आयोजक प्रा. विजया मारोतकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या वाटचालीची माहिती देतांना सांगितले की’ गेल्या तीन-चार वर्षापासून मराठीच्या संवर्धनाकरिता  झपाटलेल्या माय मराठी नक्षत्र समूहाने मराठीच्या संवर्धनाकरिता, मराठी करता अनेक कार्यक्रम घेतले, ज्यामध्ये आषाढस्य प्रथम दिवसे, विविध पुरस्कार,  विविध स्पर्धा, कविसंमेलने, पुस्तक प्रकाशन, मराठी राजभाषा गौरव दिन अशी आयोजने केलीत. “नक्षत्र प्रभा ” या प्रतिनिधीक काव्यसंग्रहाची निर्मिती करून मान्यवरांच्या उपस्थितीत देखणा  प्रकाशन सोहळा पार पाडला. निसर्गाच्या सान्निध्यात साहित्यीक सहल आणि कविसंमेलनांचे आयोजन केले. लॉकडाउनच्या काळातही माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत होते. आजवर या संस्थेच्या विविध कार्यक्रमात माई सिंधुताई सपकाळ, सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड, आचार्य गोविंद नांदेडे, सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, डॉ. शोभाताई रोकडे,  गोव्या च्या प्रिया कालिका बापट, झी टी व्ही कलाकार श्रेया बुगडे ,किशोर बळी, सुप्रसिद्ध कवी प्रवीण दवणे ,वा. ना.आंधळे, जागतिक कीर्तीचे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर अशा एकापेक्षा एक मातब्बर लोकांनी अतिथी पद भूषवून संस्थेचा गौरव केलेला आहे. आजवर 28 कार्यक्रम पार पडले या पैकी 14 कार्यक्रम हे लॉकडाऊन च्या पूर्वी तर 14 कार्यक्रम दरम्यान काळात ऑनलाइन घेण्यात आले. आजचा एकोणतिसावा कार्यक्रम म्हणजे ‘पदग्रहण समारंभाचा कार्यक्रम’ होय. आम्ही आधी आमचा पाया मजबूत केला, मराठीची मूठ बांधली आणि जेव्हा वज्रमूठ झाली,अशी खात्री झाली, तेव्हा संस्था रजिस्टर होऊन आज ‘कार्यकारिणी पदग्रहण समारंभा’ चे आयोजन केलेले आहे .येथे कोणीही अधिकारी नाही.  पदांचे वाटप केले जात असले तरी, प्रत्येक सदस्य या ठिकाणी एक एक नक्षत्र आहे. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात नामवंत असल्याचे लक्षात येते.  भविष्यात मराठीच्या उत्थानासाठी सर्वांच्या सहकार्याने करता येईल तेवढे काम सर्वांनी मिळून करावयाचे आहे.’
विशाल देवतळे भूमिका कथन करताना म्हणाले की,’आजचा हा पदग्रहण सोहळा म्हणजे प्रत्येकाला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणे आहे. ज्यामुळे आता आमच्या कामाला वेग येणार आणि प्रचंड वेगाने मराठी करता जे जे करता येण्यासारखा आहे ते विविध प्रकल्प राबवत राहणार. ज्यामध्ये मराठीच्या संवर्धनाचा विषय असेल, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान कटिबद्ध राहण्याचा विषय असेल, याकरिता आजच्या या आयोजनाचे प्रयोजन आहे. ‘यानंतर मान्यवर अतिथींच्या हस्ते  पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प तसेच बॅच प्रदान करून पदभार देण्यात आला. सर्व सदस्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. ज्यामध्ये – मी आजपासून माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचा पदभार स्वीकारला असून माझ्या पदाशी कार्यनिष्ठ राहून तन-मन-धनाने मराठी करता काम करेल ,’अशी प्रतिज्ञा घेतली.त्यानंतर माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानची कार्यकारिणी खालील प्रमाणे घोषित करण्यात आली–
सल्लागार व मार्गदर्शक 
*मा.माधुरीताई अशीरगडे ,
*प्रा.प्रभाकर तांडेकर
*अध्यक्ष -प्रा. विजया मारोतकर *उपाध्यक्ष- विशाल देवतळे
*सचिव -मंगेश बावसे,
*सहसचिव -चारुदत्त अघोर
* कोषाध्यक्ष -डॉ.माधव शोभणे
*प्रसिद्धी विभाग प्रमुख -राजश्री कुळकर्णी,
*संघटक- अरुणा कडू
*सदस्य -निता अल्लेवार
  यांना पदभार सोपविण्यात आला
.
कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख अतिथी मा.श्रीकांत गोडबोले आपल्या मनोगतात म्हणाले ,की-” माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे सर्व प्रमुख पदाधिकारी आपापल्या क्षेत्रात हरहुन्नरी असलेले नक्षत्र आहेत .विजया मारोतकर हे नाव आज सर्वाना ‘पोरी जरा जपून’ च्या अनुषंगाने माहित आहे. “बेटी बचाव..” करिता अतिशय मोलाचे कार्य करीत असलेल्या विजया  मारोतकर यांच्या नेतृत्वामध्ये ही संस्था मराठी करता खूप काम करेल आणि स्वतःचा एक स्वतंत्र ठसा निर्माण करेल, याची मला खात्री वाटते, मंगेश बावसे,चारुदत्त अघोर हे नाट्य क्षेत्रात नामवंत तसेच
कवी व सहित्यिक आहेत. सर्व साहित्यिक हे साहित्य पंढरीचे वारकरी असतात. माणूस माणसाशी जोडल्या जाण्याचे साधन म्हणजे भाषा साधर्म्य. प्रत्येक समाज घटक एक स्वतंत्र पुस्तक असतो. साहित्यिक ते प्रत्येक पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करतो नव्हे भविष्यातील माणूस लिहिण्याचा प्रयत्न करतो, माणसातील संवेदनशीलतेची नोंद करण्याचा प्रयत्न करतो, म्हणून साहित्यिक हा खरा कार्यकर्ता आहे. आपण पदवीधर तर झालो आता विद्याधर होण्याची गरज आहे.तरच विचारवंत, विचार करण्याची ईच्छा असणारा निरक्षिलविवेक वाटचाल करणारा सजग माणूस घडवता येईल.”असा संदेश त्यांनी दिला .
सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने ..
आपले मनोगत व्यक्त करताना
सचिव मंगेश बावसे आणि सहसचिव चारुदत्त अघोर म्हणाले की – ‘आम्हाला दिलेल्या पदाशी आम्ही कार्यनिष्ठ राहून,आमच्या सेवा देण्याचा प्रयास करू, आजचा दिवस आमच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा दिवस आहे. ‘मान्यवरांचा परिचय मा.माधव शोभणे व अरुणा कडू यांनी करुन दिला. शीला बीडकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात  पसायदान सादर केले.कार्यक्रमाची मोहक अशी  डिजिटल पत्रीका उज्वला इंगळे यांनी तयार केली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजश्री कुळकर्णी यांनी केले तर कार्यक्रमाचे अतिशय नेटके सूत्रसंचालन आनंदी चौधरी यांनी केले. शीला बिडकर यांच्या सुमधूर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. पंडित बच्छराज हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झालेल्या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याला सर्व सदस्य तसेच मराठी साहित्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.