Home Breaking News दसरा मेळाव्यात जोशी प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्णय, रामदास कदम यांची अनुपस्थित

दसरा मेळाव्यात जोशी प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्याचा निर्णय, रामदास कदम यांची अनुपस्थित

34 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर:-

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याच्या आरोपांमुळे वादात अडकलेले शिवसेनेचे नेते  रामदास कदम हे शुक्रवारच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसे पत्रही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिल्याचे खात्रीलायकरित्या समजते. असे असले, तरी प्रत्यक्षात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या बाबतील घडलेल्या प्रसंगाची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठीच कदम यांनी असा मार्ग अवलंबिल्याचे शिवसेनेच्या गोटातून समजते. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले. हे आरोप करण्यासाठी शिवसेनेच्याच एका नेत्याने त्यांना माहिती पुरवल्याचा आरोप झाला होता. ते नेते रामदास कदम असल्याची चर्चा होती. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी थेट नाव घेऊन तसा आरोप केला. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे व रामदास कदम यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप प्रसारित झाली होती. त्यामुळे कदम यांच्यावरचा संशय बळावला. या संपूर्ण घडामोडींमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. या नाराजीमुळेच रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचेही खासगीत बोलले जाऊ लागले. मात्र, त्या चर्चेला पूर्णविराम देत प्रकृती अस्वास्थ्यामुळे रामदास कदम मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कदम हे आजारी आहेत. मधल्या काळात त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. तसेच दोन महिने त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मनोहर जोशी संदर्भात घडलेला प्रसंग
कदम यांनी परिस्थितीचा अंदाज घेऊन काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या संदर्भात घडलेल्या प्रसंगाची पुनरावृत्ती टाळल्याचे बोलले जात आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेबद्दल जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्याचा फटका मनोहर जोशींना बसला होता. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मनोहर जोशी व्यासपीठावर येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. जोशींच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. शिवसैनिकांच्या रोषामुळे शेवटी मनोहर जोशी यांना मेळावा सोडून घरी परतावे लागले होते. कदम यांच्यासंदर्भातही अशाप्रकारची घोषणाबाजी करण्यात येणार होती. तशी जबाबदारीच शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचे कळते.