घरोघरी गणपती विराजमान,आले आनंदाला उधान

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12840*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

1181

विदर्भ वतन,नागपूर-गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… असा जयघोष करीत शुक्रवारी घरोघरी बाप्पांचे आगमन झाले. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे पसरलेल्या निराशेच्या वातावरणात श्रीगणेशाच्या आगमनाने चैतन्याचे रंग भरले. कोरोनारूपी विघ्न दूर करण्याचे साकडे घालत भाविकांनी श्रींची स्थापना केली. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणरायांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.


कोरोनाच्या संकटामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासन, प्रशासनाकडून करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच घराघरांमध्ये बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू होती. गणरायाची मूर्ती घरी नेण्यासाठी सकाळपासूनच गणेश मूर्तींच्या स्टॉलवर भाविकांची गर्दी होती. फुलांची आरास, लायटिंगच्या माळा, छोटखानी देखाव्यांच्या माध्यमातून बाप्पा घरोघरी विराजमान झाले. मोदक, मिठाई आणि प्रसादाच्या गोडव्याने हा आनंद द्विगुणित झाला. महाल, इतवारी, गांधीबाग, गोकूळपेठ, चितारओळी, मानेवाडा यासह शहराच्या अन्य बाजारापेठांमधून अनेकांनी सहकुटुंब जयघोष करीत बाप्पाला घरी नेले. कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीत, कोणी रिक्षात घेऊन जाताना दिसत होते. काहींनी बाप्पाला डोक्यावर घेऊन मिरवणूक काढली. काहींनी पारंपरिक वेशभूषाही केली होती. दुपारी एक वाजतानंतर मेघराजसुद्धा बरसले. पावसाच्या या धारांना ढोल-ताशांचा ठेका समजत भाविकांनी मिरवणूक काढली.

२४८ ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था
शनिवारपासून दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. तलावांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास बंदी घालण्यात आली असून, ठिकठिकाणी महापालिकेने कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. महापालिकेने १६६ ठिकाणी २४८ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनाही तलावात विसर्जन करण्यास बंदी आहे. कृत्रिम तलावांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्यावर महापालिकेचा भर आहे. गणेश मंडळांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.शहरात कडेकोट बंदोबस्त
प्रशासनाचे निबर्ंध असूनही मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पूर्वीसारखाच उत्साह कायम ठेवत बाप्पाला विराजमान केले. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहरात ८0६ गणेशमंडळांना परवानगी देण्यात आली आहे. तर बंदोबस्तासाठी साडेतीन हजार पोलिस कर्मचारी, एक हजार होमगार्ड व एक एसआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली आहे. मंडळांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.