
नवी दिल्ली ; पीटीआय : पुजार्याला मंदिराच्या स्थावर अथवा जंगम मालमत्तेचा मालक मानले जाऊ शकत नाही. मंदिरांची ‘महसुली’ मालकी ही ते मंदिर ज्या देवाचे वा देवीचे आहे, त्या देवाची वा देवीकडेच असते, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने दिलेल्या या निकालात, संबंधित मंदिराचा पुजारी हा केवळ मंदिराच्या मालमत्तेचा व्यवस्थापक किंवा नोकर असतो, असेही नमूद केले आहे.
पुजारी हा केवळ मंदिर व्यवस्थापनाच्या उद्देशाने मंदिराच्या मालकीच्या जमिनीशी संबंधित कामे करू शकेल. पुजार्याचे नाव महसूल रेकॉर्डमध्ये मालक म्हणून नमूद करणे आवश्यक नाहीच. किंबहुना, तसे आवश्यक असल्याचे आजवरच्या कुठल्याही न्यायालयीन निर्णयात, आदेशात नमूद नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
मालमत्तादार या रकान्यात केवळ देवाचे किंवा देवीचे नाव नमूद असावे. मंदिराच्या जमिनीचा वापरही नोकर, व्यवस्थापक आदींमार्फतच मंदिरातील देवताच करत असते. म्हणून व्यवस्थापक किंवा पुजारी यांचे नाव वापरकर्ता या रकान्यातही लिहिण्याची गरज नाही, असेही या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. मंदिर जर राज्य सरकारशी संलग्न नसेल, तर जिल्हाधिकार्यांचे नावही व्यवस्थापक म्हणून नोंदविले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

