“अनुभूतीची अभिव्यक्ती भावनेच्या एकरुपतेतून व्यक्त झाली की सुरेख कविता साकारते” : मारोतकर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12733*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

432

विदर्भ वतन,नागपूर-“अनुभूतीची अभिव्यक्ती भावनेच्या एकरुपतेतून व्यक्त झाली की सुरेख कविता साकारते”
असे उदगार सुप्रसिद्ध कवयित्री प्रा.विजया मारोतकर यांनी काढले. विदर्भ साहित्य संघ, नागपूर यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय उ. रा. गिरी स्मृतीदिना प्रित्यर्थ आयोजित कविसंमेलन प्रसंगी त्या कवीसंमेलन अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
कविवर्य उ. रा. गिरी हे विदर्भाला पडलेलं सुरेख असं स्वप्न होतं ,त्यांच्या जगण्याच्या अनुभूतीने त्यांना दिलेलं सुरेख काव्य अजरामर झालेलं आहे. त्यांच्या जगण्यातील अनेक प्रसंग उलगडतांना ‘सकाळ’ ही कविता सायंकाळी गायची नसते’. या वाक्याशी निगडीत दि. पाच सप्टेंबर 1986 या त्यांच्या मृत्युदिनी घडलेला प्रसंग उलगडला. प्रबोधन विद्यालय,दयार्पूर येथील शिक्षक दिनी त्यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले होते. कार्यक्रम संपन्न झाला. ते परत जायला निघाले. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी त्यांना घेरले आणि आग्रह केला की -“आमच्या नवव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाला असलेली ‘सकाळ’ कविता,आपण आम्हाला म्हणून दाखवा”. त्यावेळेला उ. रा. गिरी त्या विद्यार्थ्यांना म्हणाले
की -” बेटा,बघा आता सायंकाळ झालेली आहे. ‘सकाळ’ सायंकाळी
गायची नसते.याकरिता एखाद्या सकाळी मी पुन्हा येईल.’
परंतु तसे झाले नाही. परतीच्या प्रवासात घरी पोहोचत पर्यंतच त्यांचे हृदयविकाराने दु:खद निधन झाले.या हळव्या आठवणी सह पुढे त्यांनी स्व.
उ.रा. गिरी यांचा जीवनपटच सुरेखरित्या उलगडला. डॉ. ज. गो. चव्हाण या त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे “मी एकटाच निघालो” आणि
“चन्द्रायणी ” काव्यसंग्रह का व कसे प्रकाशित केले..? या मागचे संदर्भ स्पष्ट केले. प्रभाकर तांडेकर संपादित “पूळणी वरच्या पाऊलखुणा” या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख केला. विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी डॉ. रवींद्र शोभणे आणि विलास मानेकर इतर पदाधिकारी यांनी आयोजित केलेल्या या कविसंमेलनात विदभार्तील कवी कवयित्रिंचा सहभाग होता.
स्त्री जाणीवा, निसर्ग, गझल, जीवनाचे विविध रंग सुषमा मुलमुले, सना पंडित, प्रज्ञा खोडे, मंदा खंडारे, संजय तिजारे, श्रावणी काशीकर, माधव शोभणे, पवन कांमडी, स्वाती धर्माधिकारी, स्मिता भांडारकर, आनंद देशपांडे, शलाका जोशी, वसुधा वैद्य, प्रसन्न शेंबेकर, साधना सुरकर, ऋचा मांजरखेडे, रश्मी मदन कर, धनश्री धारकर, अनुराधा हवालदार, ज्योत्स्ना कदम, भारती दवणे, वीणा रणदिवे, मोना कोकणे, आदिती देशमुख, दीपक वाकडे अशा सत्तावीस कवी आणि कवयित्री यांनी विविध विषयांवरील कविता सादर करून कविसंमेलनात रंग भरला. प्रास्ताविक शलाका जोशी यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले.
कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करण्यात आले.
—————-