मारबत शिरवायला आले आणि चार वाघ नदीत वाहून गेले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12729*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

558

विदर्भ वतन,आमगाव (गोंदिया)-तालुक्यातील कालिमाटी येथील सात युवक मारबत विसर्जनाकरिता वाघ नदीच्या मुंडीपार येथील काठावर गेले होते. नदीपात्रात आंघोळीदरम्यान चार युवक वाहून गेल्याची घटना मंगळवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. संतोष अशोक बहेकार (१९), रोहित नंदकिशोर बहेकार (१८) मयूर अशोक खोब्रागडे (२१), सुमित दिलीप शेंडे (१६) सर्व रा. कालीमाटी ता. आमगाव अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. वृत्त लिहीपर्यंत आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधकार्य सुरू होते.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळच्या सुमारास संतोष बहेकार, रोहित बहेकार, मयूर खोब्रागडे, सुमित शेंडे, कार्तिक दोनोडे, विशाल मेंढे व रोहित फुंडे हे सात मित्र मारबत विसर्जनाकरिता वाघ नदीच्या मुंडीपार येथील घुबडघाट काठावर गेले होते. दरम्यान सातही मित्रांनी नदीपात्रात आंघोळीचा बेत आखला. परंतु हा बेत चार मित्रांच्या जीवावर ओढावला. पाण्याचा अंदाज चुकल्याने संतोष, रोहित, मयूर, सुमित हे खोल पाण्यात बुडाले. इतर तिन्ही मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु ते अयशस्वी ठरले. घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच आमगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत बचाव व शोधकार्य सुरू केला आहे. एकही मृतदेह हाती लागला नव्हता, वृत्त लिहीपर्यंत शोधकार्य सुरू होते.