Home Breaking News ‘राजकारणातले फ्युज बल्ब सक्रिय’!

‘राजकारणातले फ्युज बल्ब सक्रिय’!

0
‘राजकारणातले फ्युज बल्ब सक्रिय’!

पक्ष व वर्तमान नगरसेवकांची वाढली डोकेदुखी?

अजय बिवडे, संपादक
विदर्भ वतन वृत्तपत्र / न्युज पोर्टल विशेष नागपूर
महानगरपालिका निवडणूकांचे बिगुल वाजलेले आहे़ महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांचा कार्यकाळ हा येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यांमध्ये पुर्णत्वास येत आहे़ त्यामुळे नियमानुसार कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आत निवडणूका पार पाडणे अपेक्षित आहे़ मनपा निवडणूका वार्ड पद्धतीने होणार की, प्रभाग पद्धतीने याचा पेच काही दिवसांपासून कायम होता़ मात्र राज्य निवडणुक आयोगाने एकल वार्ड पद्धतीनुसार निवडणूका होणार असल्याचे दिशानिर्देश दिले असतांना दोन वार्डाचा एक प्रभाग होईल आणि निवडणूका घेतल्या जाईल असा कयासही लावला जात आहे़ अशातच प्रभाग पद्धतीनुसार निवडणूका घेतल्यास स्थानिक स्तरावर राजकारणाचे समिकरण मांडणे तसेच बुथ स्तरावर तयारी करणे हे राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील राजकीय पक्षांना सोयीचे जाते़ तसेच त्या प्रकारे कार्यकर्त्यांचा गुटही प्रभाग स्तरावर कार्यरत असतो़ यात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पक्ष यांसारख्या पक्षांची बांधणी ही प्रभागानुसार झालेली आहे़
अपक्ष उमेदवाराला प्रभागातील मोर्चेबांधणी करण्यात मोठ्या प्रमाणात अडचण असते़ यात काही मोठे जनप्रतिनिधी वगळता किंवा पक्षाचे बंडखोर वगळता इतरांना विजयी होणे शक्य नसतेच़ तसेच एकल वार्ड पद्धतीमध्ये अनेक इच्छुकांची भडीमार असतेच शिवाय स्थानिक पक्षांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो़
अशातच वार्ड पद्धतीने निवडणूका होणार या निर्णयाने अनेक राजकीय पक्षांतील ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक सक्रिय झालेले आहे़ हे मागील अनेक वर्षांपासून पक्षाच्या कोणत्याही बैठकांना उपस्थित

नव्हतेच शिवाय संपर्कात नव्हते असे ‘फ्युज बल्ब’ आता निवडणूकांच्या तोंडावर सक्रिय झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे़ हे आता राजकीय पक्षांचे व इच्छुक उमेदवारांसह वर्तमान नगरसेवकांनाही डोकेदुखी ठरत आहे असेच म्हणावे लागेल़ अशा माजी कार्यकर्त्यांची भरमार ही भाजप,शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह स्थानिक पक्षात झालेली असतांनाच उमेदवारी जाहिर करतांना हे ‘फ्युज बल्ब’ आपल्या उमेदवारीसाठी खटाटोप करतीलच़ शिवाय मनपा निवडणूकीत उमेदवारी न मिळाल्यास गटबाजीचे वातावरण निर्माण होऊन बंडखोरी होईल याचीही शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे वार्ड पद्धतीने पक्षाचे निष्ठावंत हा ‘एजेंडा’ वरचेवर उच्चारणारेच बंडखोरीचे जनक ठरतील हेच चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे़
मागील पाच वर्षांमध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये युवा कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रवेश केलेला आहे़ त्यामुळे आता युवकांना संधी देण्यात यावी असा आवाजही बळकट होत आहे़ आम्हीच पक्षांचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते असे म्हणवणारे काही ‘आतातरी उमेदवारी द्या’ या अपेक्षेने कार्यरत असतांनाच निवडणूकीच्या तोंडावर ‘कोणी उमेदवारी देता का़़़उमेदवारी’ असा सुर लावून पक्षांतर करतील हेही नक्कीच़ त्यामुळे ‘मनपा निवडणूक-२०२२’ ला बंडखोरीचे ग्रहण हे प्रत्येक पक्षाला सहन करावे लागेल याचा अंदाज आजच्या राजकीय परिस्थितीवरून लक्षात येते़
———————–
महाविकास आघाडी स्वतंत्र लढणार?
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीची सत्ता आहे़ राज्यात सत्ता स्थापन झाली तेव्हापासून तीनही पक्षांतील अंतर्गत कलह असल्याचे वारंवार सांगण्यात आले़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तर ‘एकला चलो रे’ चा नारा देत दिल्लीवारीही केली़ तसेच शिवसेनेची नवी कार्यकारिणर विदर्भात पक्ष मजबूत करण्यात व्यस्त असली तरी पक्षांतर्गत कलह येथेही एरणीवर आलेला आहे़ सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर महानगरपालिकेत दुनेश्वर पेठे हे एकच नगरसेवक होते़ आता त्यांच्या हाती शहर अध्यक्षपदाची धुरा आल्यामुळे त्यांनीही पक्षमजबुतीसाठी प्रयत्न चालविले आहे़ त्यामुळे महाविकास आघाडीतील तिनही पक्ष स्वतंत्र लढल्यास सत्तेची रस्सीखेच मनपा निवडणुकीत पहायला मिळेल
————————–
‘अपक्ष उमेदवारांची भरमार’
मनपा निवडणूक २०२२ ही एकल वार्ड पद्धतीने होत असल्यास वार्डातील जनप्रतिनिधी ‘नगरसेवक आपणच’ हा एजेंडा घेऊन रणांगणात उतरतील़ शिवाय छोटे पक्षही काही अपक्ष उमेदवारांना आपल्या पक्षातून उमेदवारी बहाल करतील़ सोबतच गल्लीबोळातील इच्छुक सक्रिय झाले असून येत्या महानगरपालिका निवडणूकीत उमेदवारांची संख्या ही प्रत्येक वार्डात किमान ३० च्या वरच असेल़
—————