विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेत वाद शिगेला पोहोचला असून या नाट्याचा आता नवा अंक सुरु झाला आहे. राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना आज ईडीने नोटीस बजावली आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीसंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली असून मंगळवार 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे अनिल परब हे ईडीच्या चौकशीला हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुरुवातीला ट्विट करत परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याची माहिती दिली. शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. क्रोनोलॉजी कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू..जय महाराष्ट्र, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच आम्ही धमक्या देत नाही. आमच्याकडे नैतिकतेचे बळ आहे. आम्ही गुन्हेगार नाही. तुम्ही कारवाई करत राहा आम्ही लढत राहू.
शिवसेना, शिवसेनेचे मंत्री डगमगणार नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. तर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले की, परिवहन मंत्री अनिल परब हे धडाडीने काम करणारे नेते आहेत. ईडीची नोटीस बजावणे हे घाणेरडे आणि गलिच्छ राजकारण आहे. मला यांची किव येते. भाजपचे नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? असा सवाल करतानात महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचे हे काम असल्याचे सावंत म्हणाले. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा आणखी एक वसुलीमंत्री अनिल परबला आता ईडीकडे जाऊन कुठून किती वसुली करण्यात आली आणि पैसे कुठे गेले. मग ते सचिन वाझेचे 100 कोटी रुपये दर महिन्याचे किंवा आरटीओ ट्रान्सफरचे पैसे, दापोलीला रिसॉर्ट बांधला तो पैसा कुठून आला याचा हिशोब द्यावा लागणार. ठाकरे सरकारचे राज्यात कायद्याचे नाही काय द्यायचे राज्य आहे. सगळ्या वसुलीबाजांना जे घोटाळे केले आहेत त्याचा हिशोब द्यावा लागेल, अशी टीका केली आहे.
भाजपा आमदार नितेश राणे यांनीही अनिल परब यांच्या पापाचा घडा भरलाच होता. त्यांचा परिवहन खात्यातील भ्रष्टाचार उघड होता. त्यामुळे ईडीकडून त्यांना काही प्रेमपत्रं येणार नव्हते त्यांना नोटीसच मिळणार होती. आता पळपुटेपणा करू नये. ईडीच्यासमोर जाऊन स्वत:ला निर्दोष असल्याचे सिद्ध करावे, असे म्हटले आहे.

