Home Breaking News अभिमानास्पद! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक

अभिमानास्पद! टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भविना पटेलने पटकावले रौप्य पदक

32 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : टोकियो – भारताच्या भविना पटेलने टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भविना पटेलने रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा दिनी देशवासियांना जल्लोषाची संधी दिली आहे. भविनाकडे सुवर्ण पदक कमावण्याची संधी होती. परंतु अंतिम सामन्यात तिला 3-0ने पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत नंबर वन असलेली चीनची पॅडलर झाऊ यिंगने 11-7, 11- 5, 11-6 असा भविनाचा पराभव केला.

भविना पटेल ही पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सिल्व्हर मेडल पटकावणारी दुसरी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी 2016 साली दीपा मलिकने ही कामगिरी केली होती. तिने गोळाफेक स्पर्धेत 4.61 मीटर थ्रो करत सिल्व्हर मेडल पटकावले होते. यंदा भविनाने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आपली मोहीम नेटाने सुरू केली होती. तिने या स्पर्धेत जागतिक क्रमांक 2 आणि 3 सारख्या तगड्या खेळाडूंना धूळ चारली होती. तिला खेळताना पाहून असे अजिबात वाटले नाही की ती प्रथमच पॅरालिम्पिक खेळांच्या मंचावर उतरली आहे. मात्र अखेर जगात 12व्या क्रमांकाच्या भविनाला वर्ल्ड नंबर वन असलेल्या झाऊ यिंगचा सामना करावा लागला आणि त्यातच तिचा पराभव झाला. परंतु टोकियो पॅरालिम्पिकमध्ये महिला टेबल टेनिसपटू भविना पटेलने रौप्य पदक जिंकणे हेदेखील अत्यंत अभिमानास्पद आहे.