वाघाच्या दातांसह चार आरोपी जेरबंद, बुटीबोरी वनअधिका-यांची कार्रवाई

625

विदर्भ वतन,नागपूर-नागपूर वनविभागातील बुटीबोरी वनपरिक्षेत्राने वाघांच्या दातासह चार आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारावर वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. विजय हरिभाऊ वाघ (वय ३३) रा.बुटीबोरी, परसराम नंदू बिजवे (वय ३६) रा. तास, गणेश देवीदास रामटेके (वय २८) रा. बोर्डकला आणि दीक्षानंद दिलीप राऊत रा.मसाळा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
नागपूर वनविभागातील बुटीबोरी वनपरिक्षेत्राला २७ ऑगस्ट रोजी वाघाच्या दातांची विक्री होणार असून, ही विक्री नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ येथील अपना पंजाब ढाबाजवळ होणार असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई करण्यात आली. यावेळी वाघाचे दात, वाहन दुचाकी गाडी हिरो पॅशन प्रो एमएच- ४0 एडी ९१५२, हिरो होंडा स्पेलेंडर प्रो एमएच-४0 एडब्ल्यू २७८३ सह ४ आरोपीना अटक करण्यात आली. या आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी दुपारपर्यंत न्यायालयीन प्रकिया पूर्ण करून चारही आरोपींना प्रथम न्यायदंडाधिकारी, नागपूर ग्रामीण यांनी ३ सप्टेंबरपर्यंत वनकोठडी सुनावली आहे. यात आणखी आरोपींना अटक करण्यात येणार असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक एन.जी.चांदेवार यांनी सांगीतले. सदर कारवाई नागपूर विभागाचे उपवनरंसक्षक भारतसिंग हाडा यांच्या मार्गदर्शनात बुटीबोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल.व्ही. ठोकळ, वनपाल केकान, एस. व्ही. नागरगोजे, मुंडे, टवले, शेंडे, चव्हाण व इतर वनकर्मचार्‍यांनी कारवाई पार पाडली. पुढील तपास अन्वेषण सहाय्यक वनसंरक्षक एन.जी.चांदेवार हे करीत आहे.