Home Breaking News एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट; महिला वाहकाच्या हाताला दुखापत

एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट; महिला वाहकाच्या हाताला दुखापत

0
एसटीच्या तिकीट मशीनमध्ये स्फोट; महिला वाहकाच्या हाताला दुखापत

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : गोंदिया- एसटीच्या तिकीट मशिनमध्ये स्फोट झाल्याची धक्‍कादायक घटना गोंदियाच्या मुख्य बसस्थानक परिसरात घडली आहे. या दुर्घटनेत महिला वाहकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. प्रवाशांना तिकीट दिल्यानंतर रुट बदलत असताना तिकीट मशिनमध्ये स्फोट झाला. कल्पना मेश्राम असे जखमी महिला वाहकाचे नाव आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महिला वाहकाने तक्रार दाखल केली आहे.

चालक लिलाधर मडवी व वाहक कल्पना मेश्राम हे दोघे अहेरी येथून एसटी घेऊन गोंदियाला आले होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास ते बसस्थानकात पोचले व प्रवासी उतरत असताना वाहक कल्पना मेश्राम चालकाच्या बाजूला सीटवर बसल्या होत्या. तर तिकीट मशीन समोर ठेवली होती. प्रवासी उतरल्यावर मेश्राम यांनी रुट बदलत असताना अचानक तिकीट मशिनमध्ये स्फोट झाला व त्यात मेश्राम यांच्या उजव्या हाताचा पंजा भाजला गेला. या घटनेनंतर लगेचेच मेश्राम यांना केटीएस रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दरम्यान, तिकीट वेंडिंग मशिनमधून प्रिंट न निघणे, मशीन अचानक बंद पडणे, तर कधी चुकीच्या तिकीट प्रिंट होणे असा अनेक तक्रारी वाहकांनी एसटी महामंडळाकडे केल्या होत्या. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. मशीन आऊट डेटेड होऊनही बदलून दिलेल्या नाहीत त्यातूनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.