Home Breaking News आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचे निधन

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचे निधन

0
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ गेल अ‍ॅम्व्हेट यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : सांगली – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, विचारवंत, लेखिका, कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचे आज वयाच्या ८१व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी १० वाजता कासेगाव (जि. सांगली) येथे क्रांतिवीर बाबूजी पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. गेल यांचा जन्म अमेरिकेतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. कार्लटेन कॉलेजमध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मिन्याप्यालीस विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अमेरिकेच्या युद्धखोर साम्राज्यवादी धोरणांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या विद्यार्थी चळवळीत त्या सक्रीय झाल्या. त्यांनी विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करण्यास सुरुवात केली. कामगार कष्टकऱ्यांचे शोषण त्या जवळून पाहत होत्या. वर्गीय आणि लैंगिक शोषण पाहून त्या अस्वस्थ होत होत्या. वैभवशाली अमेरिकेत पायाशी सारी सुखं लोळण घेत असतानाही त्या अभ्यासाच्या निमित्ताने भारतात आल्या. संपूर्ण भारतभर फिरल्यानंतर इथल्या अनेक चळवळींचा त्यांनी जवळून अभ्यास केला. अभ्यास करता करता कष्टकऱ्यांच्या चळवळींचा त्या एक भाग बनल्या. चळवळींना भक्कम वैचारिक पाया देण्यास त्यांनी मदत केली आणि अमेरिकेतील गोऱ्या मॅडम पाहता पाहता अगदी अस्सल मराठमोळी बाई झाल्या. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या त्या सहचारिणी. गेल अ‍ॅम्व्हेट या भारत पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या लढ्याच्या अग्रभागी राहिल्या. मोर्चे, आंदोलनात चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन त्यांनी कामगार कष्टकऱ्यांचे नेतृत्त्व केले. त्यांनी आपले ज्ञानच नव्हे, तर पूर्ण आयुष्यही इथल्या कष्टकऱ्यांच्या चळवळीसाठी समर्पित केले.

दरम्यान, अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर ऑम्व्हेट भारतात आल्या. इथे वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास करत असताना त्या महाराष्ट्रातदेखील आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षाला त्यांनी आपलेसे केले. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राह्मिण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बरकली विद्यापीठात सादर करून डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्यापुर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांना मैलाचा दगड ठरला आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या, धोरण समितीच्या सदस्या, बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्या व स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्त्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी करून समाजापुढे आणण्यात गेल ऑम्व्हेट यांचा मोठा वाटा होता. डॉ. गेल यांना लॉकडाऊननंतर हळूहळू चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखेखाली त्या वैद्यकीय उपचार घेत होत्या.