Home Breaking News कुपोषणामुळे एकाही मुलाचा मृत्यू झाला तर कारवाई करू; हायकोर्टाचा सरकारला इशारा

कुपोषणामुळे एकाही मुलाचा मृत्यू झाला तर कारवाई करू; हायकोर्टाचा सरकारला इशारा

0
कुपोषणामुळे एकाही मुलाचा मृत्यू झाला तर कारवाई करू; हायकोर्टाचा सरकारला इशारा

कुपोषणामुळे एकाही मुलाचा मृत्यू झाला तर कारवाई करू; हायकोर्टाचा सरकारला इशारा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राज्यात आदीवासी भागात कुपोषणामुळे यापुढे एकाही मुलाचा मृत्यू झाला तर कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला दिला. पुढील सुनावणी आता 6 सप्टेंबरला होणार आहे. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला किती निधी देत आहे, तसेच यावर केंद्र सरकार कशा पद्धतीने निगराणी करत आहे. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देशही हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले.

याबाबतच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेतील खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्याने गेल्या वर्षभरात मेळघाटात कुपोषणामुळे 73 मुलांचा मृत्यू झाल्याचे हायकोर्टाला सांगितले. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सर्व ती पावले उचलली जात असल्याचे सरकारी वकील नेहा भिडे यांनी सरकारच्या वतीने कोर्टात सांगितले.जर तुमच्याकडे सर्व यंत्रणा आहे तर कुपोषणामुळे 73 बालकांचा मृत्यु कसा झाला? असा परखड सवाल उपस्थित केला. हे गंभीर प्रकरण असून एप्रिल 2020 ते जुलै 2021 या कालावधीत आदिवासी भागात किती बालकांचा कुपोषणामुळे मृत्यु झाला? तसेच या भागातील सार्वजनिक आरोग्य केंद्रांवर किती वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली याची माहिती सादर करण्याचे निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले. जर पुढच्या सुनावणीच्या वेळी कुपोषणामुळे इथे आणखी बालकांचा मृत्यु झाल्याचे आम्हाला कळाले तर यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना जबाबदार धरले जाईल, असे हायकोर्टाने यावेळी सांगितले.