
१९६0 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेले सय्यद शाहिद हकीम यांचे रविवारी गुलबर्गा येथील रुग्णालयात निधन
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – माजी भारतीय फुटबॉलपटू आणि १९६0 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलेले सय्यद शाहिद हकीम यांचे रविवारी गुलबर्गा येथील रुग्णालयात निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना गुलबर्गा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सय्यद यांना ‘हकीम साब’ म्हणून ओळखले जाते.
हकीम पाच दशकांपासून भारतीय फुटबॉलशी जोडलेले होते. त्यानंतर ते भारतीय संघाचे प्रशिक्षकही झाले. भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता. १९८२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी पीके बॅनर्जी यांच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर मडेर्का चषकावेळी ते राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले.
देशांतर्गत स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून त्यांची सर्वोत्तम कामगिरी महिंद्रा अँड महिंद्रा (महिंद्रा युनायटेड) साठी होती. १९८८मध्ये त्यांच्या संघाने पश्चिम बंगालच्या मजबूत संघाला पराभूत करून ड्युरंड कप जिंकला होता. त्यानंतर ते साळगावकर क्लबचेही प्रशिक्षक राहिले होते. तसेच त्यांनी फिफाचे आंतरराष्ट्रीय पंच म्हणूनही काम पाहिले आहे. फुटबॉलसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वायू दलाचे माजी स्क्वॉड्रन लीडर असलेले हकीम भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक देखील होते. तसेच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषकापूर्वी प्रकल्प संचालक राहिले.
हकीम सेंट्रल मिडफिल्डर म्हणून खेळत असत. १९६0च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी त्यांचे वडील सय्यद अब्दुल रहीम संघाचे प्रशिक्षकदेखील होते. त्यानंतर १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्या भारतीय संघातही त्यांना स्थान मिळू शकले नव्हते.

