
रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी भावाने किडनी देऊन वाचवले बहिणीचे प्राण
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : रोहतक – भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा रक्षाबंधन सण आज देशभरात साजरा करण्यात येत आहे. याच रक्षाबंधनाच्या फक्त एक दिवस आधी म्हणजे काल एका भावाने आपल्या बहिणीसाठी असे काही केले आहे की सगळे त्याचे कौतुक करत आहेत. हरियाणाच्या रोहतक येथील ३१ वर्षीय महिलेला तिच्या भावाने किडनी देऊन तिचे प्राण वाचविले.
मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या मोठ्या बहिणीला किडनी दान करून भावाने जीवनदान दिले. भावाचे हे कार्य पाहून गावकरी आणि कुटुंबातील सदस्यही त्याची स्तुती करत आहेत. आकाश हेल्थकेअरच्या डॉक्टरांनी सांगितले की, ही महिला गेल्या पाच वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होती आणि तिच्यावर बराच काळ उपचार सुरू होते. या दरम्यान उच्च रक्तदाबाकडे लक्ष न दिल्याने तिची किडनी खराब झाली होती. त्यानंतर ती बदलण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा उपाय नव्हता. इतर अनेक रुग्णांप्रमाणे तीही डायलिसिसच्या गैरसमजांना बळी पडली आणि प्रक्रिया सुरू करण्यास विलंब झाला. यामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर किडनी प्रत्यारोपणाचा पर्याय निवडण्यात आला. महिलेच्या कुटुंबातील अनेक सदस्यांनी त्या महिलेला किडनी दान करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिलेचा रक्तगट केवळ तिच्या भावाकडूनच सापडला. यानंतर पाच तासांच्या शस्त्रक्रियेनंतर किडनी प्रत्यारोपण करण्यात आले.

