महिला सुरक्षा व अतूट नात्यासाठी, ‘ह्यूमॅनीटी फाउंडेशनचे रेशिमबंध’

255

विदर्भ वतन वृत्तपत्र विशेष, नागपूर : रक्षा बंधन हा बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण. बहिणीच्या राखीचे बंधन आणि भावाकडून बहिणीचे रक्षण या भावनिक रेशमी आणि निर्मळ धाग्याने हे बंधन बांधलेले आहे. दरवर्षी ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनच्यावतीने जिव्हाळ्याच्या भावांना राखी पाठविण्यात येते. गेल्या वर्षीपासून सुरू असलेल्या कोरोना रोगामुळे अनेक बहिणींनी आपले भाऊ गमावले. कोरोना रोगाने माणसांना माणुसकीसुद्धा शिकविली. त्यामुळे ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनच्यावतीने परिसरातील सर्व रक्ताचे नसले तरी प्रेमाचे व जिव्हाळ्याचे नाते असलेल्या बंधुंना राखी पाठवण्याचा निर्धार केला. अनेक राख्या जिव्हाळ्याच्या भावांच्या घरी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशीच पोहचत्या झाल्याही.
भावाच्या प्रेमाच्या ओढीने, आतुरतेने आणि बहिणीच्या या पवित्र स्नेहबंधनाचा कच्चा पण मजबूत धागा भावांकडून सर्व महिलांच्या सुरक्षितता या अभिवचनाच्या अपेक्षेने भावाकडे निघाल्या. ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक पूजा मानमोडे आणि त्यांच्या सहकाºयांनी या अनोख्या रक्षाबंधनाचे बंध जपून ठेवले आहे़ पूजा मानमोडे यांनी अनेक सामाजिक कार्याच्या माध्यमातून आज आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे़ काही दिवसांपुर्वीच नरसाळा येथील एका शालेय विद्यार्थिनीला मोबाईल संचाअभावी आँनलाईन शिक्षणात अडचण येत होती़ विद्यार्थिनीची घरची परिस्थिती बेताचीच़ आर्थिक अडचणीमुळे पालक मोबाईल संच घेण्यास असमर्थ होते़ विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतुने पूजा मानमोडे यांना माहिती मिळताच त्यांनी त्या विद्यार्थिनीला मोबाईल संच भेट दिला़ तसेच तिच्या पुढील शिक्षणाचे पालकत्वही स्विकारले़ पूजा मानमोडे यांच्या मदतीने विद्यार्थिनीने एक भावनिक पत्र पूजा मानमोडे यांना लिहीले होते़ यात तिने पूजा मानमोडे यांचा ‘पूजा अक्का’ असा उल्लेख केलेला होता़
नागपूर शहरातील ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक पूजा मानमोडे यांनी परिचित सर्वच भावांना आणि रहिवासी असलेल्या परिसरातील प्रत्येक घरी भावांना राखी पाठविल्या आहे. जवळपास १० हजार भावांच्या घरी या पूजा अक्काच्या राख्या जाण्यासाठी निघाल्या़ या राख्यांसोबत एक पत्र आणि त्यात एक भावनिक व विनंती संदेश घेऊन. पत्रामध्ये अनेक कुटुंबावर झालेले आघात आणि त्यातून आपण सर्वांनी सावरावे व स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केलेले आहे. भावांनी पूजा अक्का आणि सर्वच महिलांचे संरक्षण करावे अशीच ओवाळणी मागितलेली आहे़ नागपूर शहर हे महिलांसाठी सुरक्षित शहर व्हावे हाच यामागचा मुख्य हेतू आहे़ तसेच सर्व जिव्हाळ्याच्या भावांच्या संकट, अडचणीत, सुखदु:खाच्या सर्व प्रसंगात पूजा अक्का आणि ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनआपल्या सोबत असेल हा विश्वासही दिला़ त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे़ या कार्यात ह्यूमॅनीटी सोशल फाउंडेशनच्या संस्थापक पूजा मानमोडे यांच्यासह सदस्य रुपाली टिचकुले,चेतना पडोळे, पायल निनावे, अबोली येनूरकर, सपना म्हस्के, स्नेहा कोठारी, पिंकी चांदपूरकर, कल्याणी चौधरी, नलिनी साबळे, अर्चना सातपुते,स्वाती अहिरराव, वैष्णवी पांढरे, जानवी मानमोडे यांनी सहकार्य केले़