समृद्धी महामार्गाच्या कामावरुन परतणा-या मजुरांवर काळाचा घाला, १६ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाल्याची भिती

121

विदर्भ वतन, सिंदखेडराजा: – बसला साईड देत असतांना रस्त्याच्या बाजूला उभा केलेला टिप्पर क्र. एम. एच. ११ सीएच ३७२८ हा पावसामुळे रस्ता खचून कलंडला व अपघाताने रस्त्याच्या खाली पूर्णपणे उलटला. त्यामुळे टिप्परच्या मागच्या भागात असलेल्या लोखंडी बारवर बसलेले १६ जण त्याखाली दबले गेले. त्यापैकी १३ जण जागीच मृत झाल्याचा अंदाज दर्शविण्यात येत आहे़ घटना २० आॅगस्ट, शुक्रवारी दुपारी तालुक्यातील तढेगाव फाटा ते गावाकडे जाणाºया मार्गावर घडली. वाचलेल्या तिघांमध्ये एका पाचवर्षीय मुलीचा समावेश आहे. हे सर्व मजूर समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील खरगोन येथून आलेले होते. समृद्धी महामार्गाचे जवळपास सुरु असलेल्या साईटवरील काम पावसामुळे बंद पडल्याने तढेगाव येथील कॅम्पवर परतत होते, अशी प्राथमिक माहिती किनगावराजा पोलिसांनी दिली आहे. मजुरांची नावे कळू शकली नाहीत. मेहकर ते सिंदखेडराजा मार्गावरील खडकपूर्णा नदीवरील पूल कमकुवत झाल्याने जड वाहतूक तढेगाव मार्गे देऊळगावमहीकडे वळविण्यात आली असल्याने या मार्गावर रहदारी वाढली आहे.