
सेल्फी घेणे महागात पडले,सख्खे भाऊ गोसीाखुर्द धरणात बुडाले
विदर्भ वतन,उमरेड-स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी असल्याने उमरेडमधील दोघे भाऊ गोसेखुर्द धरणावर फिरायला गेले. येथे सेल्फी काढताना एकाचा तोल गेला. त्याला वाचविण्यासाठी दुसरासुद्धा पाण्यात बुडाला. यातच दोघांचाही मृत्यू झाला. मंगेश मधुकर जुनघरे (वय ३५) व लहान भाऊ विनोद ऊर्फ लल्ला जुनघरे (वय ३२), रा. रेवतकर ले-आऊट, मोहपा रोड, उमरेड अशी मृतकांची नावे आहेत. मुलांच्या जाण्याने आई-वडिलांनी तर पतीच्या जाण्याने बायकांनी एकच टाहो फोडला.
उमरेड शहरातील रेवतकर ले-आऊट, मोहपा रोड येथील भावंड स्वातंत्र्यदिनानिमित्त गोसेखुर्द धरण बघण्यास गेले. येथे या दिवशी मोठया संख्येने नागरिक गोळा होतात. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना या ठिकाणी नसल्याने सदर प्रकार घडल्याचे सांगण्यात येते. पोलिस बंदोबस्त होता. मात्र, तो पुरेसा नसल्याचे समजते. अनेक नागरिक या ठिकाणी येऊन सेल्फीचा आनंद घेताना दिसून येतात. असाच प्रकार रविवारी ४.३0 वाजताच्या सुमारास येथे घडला. उमरेड येथील मंगेश मधुकर जुनघरे व त्याचा लहान भाऊ विनोद ऊर्फ लल्ला जुनघरे धरणावर येऊन पॉवर हाऊसजवळच्या काठाजवळ सेल्फी काढत असताना विनोदचा पाय घसरला. क्षणार्धात मंगेशने विनोदचा हात पकडला. मात्र, दोघांचाही तोल गेल्याने दोघांनीही एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते अपयशी ठरले. उपस्थितांनी आरडाओरड केली. मात्र, कोणीही या भावंडांना वाचवू शकले नाही. घरी स्वस्त धान्य दुकान असल्याने मृत मंगेश ते दुकान चालवायचा. त्याला चार वर्षांचा मुलगा आहे तर विनोदने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. तो हैदराबाद येथील कंपनीत नोकरीवर होता. लॉकडाऊनमुळे तो सध्या घरूनच वर्कफ्रॉम होम म्हणून काम करीत होता. काही दिवसानंतर तो कामावर रुजू होणार होता. दोन्ही भाऊ मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कुटुंब आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

