
आयशा मलिक पाकिस्तानच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश?
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : इस्लामाबाद – पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच महिला सरन्यायाधीशांची नियुक्ती होणार आहे. पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती आयशा मलिक यांची नियुक्ती करण्याची शिफारस विद्यमान सरन्यायाधीश मुशीर आलम यांनी केली आहे. सरन्यायाधीश आलम १७ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर त्यांच्या जागी नव्या सरन्यायाधीशांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात आयशा मलिक यांचे नाव आघाडीवर आहे. त्या लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत.
आयशा मलिक यांनी १९९७पासून आपल्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. त्या २००१पर्यंत कराचीत फक्क्रुद्दीन इब्राहिम यांच्या कंपनीच्या कायदा सल्लागार होत्या. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान कॉलेज ऑफ लॉमधून कायद्याचे शिक्षण घेतले. नंतर लंडनच्या हार्वर्ड लॉमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले. मार्च २०१२पासून त्या लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांची दोन बोटांची आणि हायमेन चाचणी बेकायदा आणि पाकिस्तान संविधानाच्या विरोधात असल्याचा ऐतिहासिक निकाल त्यांनी दिला होता. त्यामुळे त्या संपूर्ण जगात ओळखल्या जातात. २०१९ मध्ये लाहोरच्या महिला न्यायमूर्तींच्या सुरक्षा समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली होती.

