शिक्षणाधिकारी वैशाली झनकरांना एसीबीकडून अटक

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नाशिक – शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत ८ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्यात. आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर तपासादरम्यान फरार होत्या. तुरुंगात जाण्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्या गायब झाल्या होत्या. मात्र एसीबीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.

दरम्यान, शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानाला मंजुरी देण्यासाठी ८ लाख रुपये लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर या फरार झाल्या होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अ‍ॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी (१४ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. दरम्यान, लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे शासनानेदेखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. त्यामुळे आता शिक्षण आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत सर्वत्र चर्चा होत असून झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

You missed