देशमुखांच्या अडचणी वाढल्या; नियमांचे उल्लंघन करत बँकांकडून घेतले कर्ज

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12112*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

167

देशमुखांच्या अडचणी वाढल्या; नियमांचे उल्लंघन करत बँकांकडून घेतले कर्ज

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशमुखांच्या विरोधात असलेल्या आरोपांच्या प्रकरणात ईडीने चौकशीचा वेग वाढवला असल्याचे दिसून येत आहे. खाजगी बँकांकडून अनिल देशमुख यांनी नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याची माहिती समोर आली असून, याबाबत चौकशीत ईडीच्या हाती काही महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
त्यामुळे आता नियमांचे उल्लंघन करुन लोन पास करण्यासाठी देशमुखांनी नेमके काय केले, याचा तपास ईडी आता करत आहे.

कर्ज म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी अशा कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्या कंपन्यांवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा हक्क आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातल्या काही कंपन्या खऱ्या तर काही शेल आहेत. त्यामुळे ईडी आता कर्ज घेतलेल्या पैशांचे काय केले याची चौकशी करत आहे. दरम्यान पोलिसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात होता, अशी कबुली आधीच सध्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला दिली आहे. इतकंच काय तर ४ मार्चला ज्ञानेश्वरी (अनिल देशमुखांचा मुंबईतील सरकारी बंगला) येथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतल्या बार मालकांकडून १०० कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी तक्रारीमध्ये केला होता. दरम्यान ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.