
अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले
विदर्भ वतन,नागपूर- नागपूर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागात कार्यरत अभियंत्याच्या घरी मंगळवारी संध्याकाळी अमरावती एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) च्या कर्मचा-यांनी छापा टाकला. एसीबी कर्मचा-यांनी या अभियंत्याला लाच घेताना रंगेहात अटक केली. बिल पास करण्यासाठी या अभियंत्याने कंत्राटदारला लाच मागितली होती. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
उदयनगर निवासी रमेशकुमार गुप्ता (वय ५४ वर्ष) हे नागपूर जिल्हा परिषद येथे कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. विभागाने लाखो रुपयांच्या निर्माण कामाचा ठेका तक्रारकर्ते कंत्राटदाराला दिला होता. कंत्राटदाराने काम पूर्ण केले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विभागाला २0 लाख रुपयांचे बिल सादर केले होते. परंतु, अभियंता रमेशकुमार हे त्यांचे बिल पास करीत नव्हते. बिल पास करण्याकरिता त्यांनी तक्रारकर्ते कंत्राटदाराला लाच मागितली. ७५ हजार रुपयांमध्ये तडजोड झाली. परंतु, तक्रारकर्त्यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणी स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. वारंवार तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नसल्यामुळे अखेर तक्रारकर्त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांना मुंबई येथे आॅनलाईन तक्रार केली. त्यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अमरावती एसीबीला कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी तक्रारकर्ते हे रमेशकुमार यांच्या उदयनगर स्थित निवासस्थानी पोहचले. तक्रारकर्त्यांनी जशी लाच रमेशकुमार यांच्या हातात दिली त्याचवेळी एसीबी कर्मचा-यांनी छापा मारला. यानंतर कर्मचार्-यांनी रमेशकुमार यांच्या निवासस्थानाची तपासणी केली. त्यांच्या चल-अचल संपत्तीची चौकशी करण्यात येत आहे.

