Home Breaking News कुंभमेळ्यात बनावट कोरोना चाचण्या, बोगस बिलंही दिली!आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी

कुंभमेळ्यात बनावट कोरोना चाचण्या, बोगस बिलंही दिली!आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/12008*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

54 views
0

कुंभमेळ्यात बनावट कोरोना चाचण्या, बोगस बिलंही दिली!आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : हरीद्वार – कोरोनाची दुसरी लाट वाढत असतानाच उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या आयोजनावर टीका झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहाननंतर प्रतिकात्मक कुंभमेळा करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, या काळात मोठ्या प्रमाणात बनावट कोरोना चाचण्या झाल्या, तसेच अनेक लॅबचालकांनी बोगस बिलंही देण्याचा प्रकार उघड झाला होता. आता हा आर्थिक व्यवहार उघड करण्यासाठी ईडीने ठिकठिकाणी छापेमारी केली असून या छाप्यांमधूनध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

कुंंभमेळ्यादरम्यान आयोजकांकडून भक्तांची चाचणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, यावेळी बोगस चाचण्या झाल्याचं नुकतंच उघड झालं. यावरून ईडीनं शुक्रवरी दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा आणि उत्तर प्रदेश या चारही राज्यांमधील पॅथोलॉजी लॅब्जवर छापे टाकले. यात नोव्हस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्ज, मॅक्स कॉर्पोरेट सर्विसेस, डॉ. लाल चंदानी लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड आणि नालवा लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिडेट यांचा समावेश असल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. दिल्ली, हरिद्वार, डेहराडून, नोएडा आणि हिसार या ठिकाणी या लॅब्जच्या संचालकांच्या घरी देखील ईडीनं छापेमारी केली आहे.

कुंभमेळ्यादरम्यान झालेल्या बोगस चाचण्यांमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गुन्हा उत्तराखंड पोलिसांनी नोंदवला होता.  त्यासंदर्भात हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामधील बोगस कोरोना चाचणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे छापे मारल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने प्रयोगशाळांना कुंभमेळ्यादरम्यान रॅपिड अँटिजेन टेस्ट आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्याचं कंत्राट दिलं होतं. मात्र, या प्रयोगशाळांनी प्रत्यक्षात कमी प्रमाणात कोरोना चाचण्या केल्या.  पण चाचण्या केल्याच्या खोट्या नोंदी केल्या आहेत. त्यासोबतच, त्यांनी बोगस बिलं देखली तयार केली असून त्या आधारे आर्थिक फायदा करून घेण्याचा त्यांचा हेतू होता, असं ईडीच्या छापेमारीतून समोर आलं आहे.

उत्तराखंडच्या महसूल खात्यानं या चाचण्यांसाठी तब्बल ३ कोटी ४ लाख रुपयांचा निधी दिला आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, अनेक लोकांसाठी या लॅब्ज एकच बनावट पत्ता किंवा एकच खोटा मोबाईल क्रमांक वापरत असत. हीच माहिती या लोकांच्या Specimen Referral Form (SRF) मध्ये भरली जायची, असं करून प्रत्यक्षात चाचणी न करताच मोठ्या संख्येने चाचणी केल्याचं या लॅब्ज भासवायच्या.

ज्या लोकांनी कधीच कुंभमेळ्याला भेटही दिलेली नाही, अशा लोकांच्या चाचण्या केल्याचं दाखवण्यात आलं आहे. या लॅब्जनी केलेल्या खोट्या चाचण्यांमुळे कुंभमेळ्याच्या वेळी हरिद्वारमधला पझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के दाखवला गेला. मात्र, प्रत्यक्षात तो ५.३ टक्के असल्याचा अंदाज ईडीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवल्याचं देखील या वृत्तात म्हटलं आहे. या छाप्यांमधून मोठ्या प्रमाणवार बनावट कागदपत्र, बोगस बिलं, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि मालमत्तेसंबंधित कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत.