दिल्लीत मुलीवर अत्याचार आणि हत्या; राहुल गांधी पीडित कुटुंबाला भेटले

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मुलीच्या आई-वडिलांसोबत मोटारीत चर्चा केली. या घटनेच्या निषेधार्थ स्मशान घाट येथे स्थानिकांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुजाऱ्यासह ४ जणांना अटक केली आहे.

दिल्लीत ९ वर्षांच्या एका निष्पाप दलित मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद राजधानीत उमटले आहेत. यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. हे अतिशय निर्दयी कृत्य असल्याचे आणि पीडित कुटुंबाला आवश्यक ती मदत करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. या प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही काल ट्विट करत दलिताची मुलगी ही देशाची मुलगी आहे, असे म्हटले होते. तर प्रियंका गांधी यांनी अमित शहा यांना लक्ष्य करून ‘ते उत्तर प्रदेशात प्रमाणपत्र वाटण्यासाठी गेले होते पण त्यांना स्वतःची जबाबदारी सांभाळता येत नाही. हाथरसपासून नांगलपर्यंत जंगलराज सुरू आहे’, असा आरोप केला होता. त्यानंतर आज सकाळी राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी तिथे असलेली गर्दी लक्षात घेऊन त्यांनी पीडितेच्या आई-वडिलांसोबत मोटारीत चर्चा केली. विशेष म्हणजे या घटनेनंतर संबंधित मुलीच्या आई-वडिलांना न सांगताच परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंगळवारी रात्री पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार उरकले. या प्रकरणात पोलिसांनी स्मशान घाटाचे पुजारी आणि इतर तिघांना अटक केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांनीही आंदोलन सुरू केले आहे.

S

You missed