ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11680*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

250

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी सांगितले. तर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक आहे, अशा शब्दांत आशा भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अमित देशमुख यांनी गुरुवारी सकाळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

आशा भोसले यांना त्यांच्या कारकिर्दीवर आधारित ‘सुवर्णरंग’ हे पुस्तक आणि महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रकाशन असलेल्या ‘लोकराज्य’ भेट म्हणून दिले. त्यावेळी आशा भोसले म्हणाल्या की, आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यासाठी आपण सर्वांचे आभारी आहोत.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण हा माझ्या मातीने केलेला माझा गौरव आहे. हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे घरच्यांकडून माझे कौतुक झाले आहे असे मी मानते, या पुरस्कारासाठी मी राज्य शासनाची आभारी आहे.

सध्या राज्यात कोविडचे संकट अजूनही संपलेले नाही. तर गेल्या आठवड्यात चिपळूण, सांगली, कोल्हापूर येथे अतिवृष्टीमुळे बरेच नुकसान झाले आहे. राज्यातील परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर सन्मानसोहळा आयोजित करावा, अशी विनंतीही त्यांनी केली.