Home Breaking News ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

0
ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

ऑलिम्पिकमध्ये भवानी देवीने रचला इतिहास

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :टोकियो – ऑलिम्पिकमध्ये आज भारताची सुरुवात अत्यंत धमाकेदार झाली. तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला. तिने ऑलिम्पिकच्या पदार्पणाच्या सामन्यात विजय नोंदवत ऐतिहासिक कामगिरी केली. आज महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 64 सामन्यात तिने ट्यूनिशियाच्या नादिया बेन अजीजीवर 15-3 ने विजय मिळवला. यासह भवानी देवी ही ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीचा सामना जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली. परंतु तलवारबाजीच्या दुसऱ्या फेरीत मात्र तिचा प्रवास थांबला. महिला सेबर व्यक्तिगत टेबल ऑफ 32 मध्ये तिचा सामना फ्रान्सच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या, विश्वचषक विजेत्या एम ब्रुनेट हिच्या विरुद्ध झाला. यात तिला 15-7 अशा फरकाने पराभव स्विकारावा लागला. यासह ऑलिम्पिकमधील भवानी देवीच्या प्रवासाला पूर्णविराम लागला आहे.

आठ वेळा राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या भवानी देवीचा आज सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्धी ट्यूनिशियाच्या नादियावर दबदबा होता. 27 वर्षीय भवानीने सामन्याचा पहिला राउंड अगदी सहज 8-0 अशा फरकाने जिंकला. मग दुसऱ्या राउंडमध्येही तिने ट्यूनिशियाच्या खेळाडूला एकही संधी दिली नाही. दुसरा राउंडही भवानी देवीने 7-3 अशा फरकाने आपल्या बाजूने केला. अवघ्या सहा मिनिटांत तिने हा सामना आपल्या खिशात घातला. भवानी देवीने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकले होते. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. 2010च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिने कांस्यपदक जिंकले होते.

दरम्यान, तलवारबाजीच्या सेबर स्पर्धेत तलवारबाज प्रतिस्पर्ध्यावर वार करून (तलवारीचा केवळ स्पर्श) गुणांची कमाई करता येते. यामध्ये कंबरेच्यावर आणि मनगटाव्यतिरिक्त कुठेही तलवारीने स्पर्श करून गुण मिळवता येतात.