
आसाममध्ये १४ वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी चक्क हत्तीणीला अटक
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :गुवाहाटी – एका १४ वर्ष वयाच्या मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चक्क एका पाळीव हत्तीणीला तिच्या पिल्लासह पोलिसांनी अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना आसाम राज्यातील गोलाघाट जिल्ह्यात घडली आहे.
बोकाखाटचे माजी आमदार जितेन गोगोई यांच्या मालकीच्या असलेल्या दुलोमोनी नावाच्या हत्तीणीने ८ जुलै रोजी नहारजन चहा इस्टेटजवळील बिजुली येथे मुलाची हत्या केली होती. या हत्तीणीविरोधात कारवाई करण्यासाठी स्थानिकांनी वन अधिकाऱ्यांवर तीव्र दबाव आणला. त्यानुसार हत्तीण आणि तिच्या पिल्लाला अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतले. साखळदंड बांधून त्यांना वन अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले. या अल्पवयीन मुलाने हत्तीच्या पिल्लाला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चिडलेल्या हत्तीणीने त्याच्यावर हल्ला केला. आतापर्यंत अशा प्रकारची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे या हत्तीणीवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. अखेर स्थानिकांच्या दबावामुळे या हत्तींणीवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

