
विद्यार्थ्यांचा मनस्ताप, सहा तासानंतरही वेबसाईट क्रश; दहावीचा निकाल पाहणार कधी?
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अंतर्गत मुल्यमापन पद्धतीच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल आज जाहीर होणार होता. दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येतील असं राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, दुपारी एक वाजल्यापासून दोन्ही वेबसाईट क्रश झालेल्या पाहायला मिळाल्या. सायंकाळच्या सहा वाजेपर्यंत वेबसाईट क्रश होती. पुढील अर्धा तासात दोन्ही वेबसाईट सुरू होतील अशी प्रतिक्रिया राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.
परीक्षा रद्द झाल्याने निकाल काय येणार याबाबत सर्वच विद्यार्थी आणि पालक उत्सुक होते. त्यामुळे दुपारी एक वाजल्यापासून सारेचजण निकाल पाहण्यासाठी वेबसाईटवर लॉग ईन झाले. मात्र, विद्यार्थांनी निकालाच्या साईटवर गर्दी केल्याने साइट क्रॅश झाली आहे. त्यामुळे निकाल जाहीर होऊनही तो पाहता येत नसल्याने विद्यार्थी आणि त्यांचे पालकही वैतागले आहेत. लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पालक एकाच वेळी निकाल पाहत असल्याने या साईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आल्याने हा प्रकार झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षा होऊ शकल्या नसल्या तरी विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल आज, शुक्रवारी जाहीर करण्यात आला. राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल सहा तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे.
दहावीच्या निकालाच्या result.mh-ssc.ac.in आणि mahahsscboard.in या वेबसाईट सुरुवातीला डाऊन होत्या. मात्र थोड्यावेळापूर्वी त्या पुन्हा त्या सुरु झाल्या होत्या. काही वेळातच त्या पुन्हा डाऊन झाल्या. दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

