Home Breaking News मुलाचा चिरला गळा, उपहार मिळाले चाकूचे वार, पत्नीच्या वाढदिवशीच घडला असा कसा...

मुलाचा चिरला गळा, उपहार मिळाले चाकूचे वार, पत्नीच्या वाढदिवशीच घडला असा कसा थरार?

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11498*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

203 views
0

मुलाचा चिरला गळा, उपहार मिळाले चाकूचे वार,
पत्नीच्या वाढदिवशीच घडला असा कसा थरार?

विदर्भ वतन,वृत्तसंस्था-हैदराबाद : तेलंगण राज्यातल्या मोईनाबादमधल्या केथिरेड्डीपल्ली येथे एका इसमाने दारूच्या नशेत असताना आपल्या पत्नीला चाकूने भोसकले तसेच स्वत:च्या दोन वर्षांच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीने पत्नीच्या वाढदिवशीच तिच्यावर चाकूने वार केले. तसेच दोन वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. या प्रकरणी २८ वर्षीय आरोपी डी. रमेश यास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, आरोपीची पत्नी शोभा गंभीर असून, तिच्यावर चेविल्ला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली. १२ जुलै रोजी शोभा हिचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने पार्टी सुरू होती. त्या वेळी शोभाची आईदेखील उपस्थित होती.
रमेश आणि शोभा हे दोघेही घटस्फोटित होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. शोभाला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता. तसेच दोन वर्षांपूर्वी रमेशपासून दुसरा मुलगा झाला होता. रमेश फारसे काम करत नसल्याने त्याची पत्नी शोभा आणि शोभाची आई सातत्याने त्याला काही ना काही बोलत असत. तो राग मनात ठेवून रमेशने हा गुन्हा केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

शोभा हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पार्टीच्या वेळी शोभा आणि तिची आई चपात्या करत असताना एकमेकींशी लांबडा या स्थानिक भाषेतून संवाद साधत होत्या. या वेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रमेशला वाटलं, की त्याची पत्नी आणि सासू आपण काम करत नसल्याने आपल्याला शिवीगाळ करीत आहेत. त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिच्यावर दगडाने हल्ला केला. तेव्हा गावातल्याच एका शेतजमिनीवर पर्यवेक्षक म्हणून काम करणारे के. राम रेड्डी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेला रमेश खूप संतापला होता. तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्याने रागाच्या भरात आपल्या पत्नीवर चाकूने वार केले आणि दोन वर्षांच्या मुलाची गळा चिरून निर्घृण हत्या केली. के. राम रेड्डी यांनी या घटनेची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर पोलिसांनी डी. रमेश याला अटक केली आहे. रमेश हा के. राम रेड्डी यांच्याच मालकाकडे काम करत होता.