आयुर्वेद विषयक ‘समज-गैरसमज’

185

– डॉ. पल्लवी स. थोटे / एम.डी. (संहिता सिद्धांत) / एम.ए. (संस्कृत स्कॉलर)
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – कोरोना काळात लोकांनी खुप मोठ्या प्रमाणात वेगवेगळया आयुर्वेदिक काढ्याचा व औषधींचा वैद्यांच्या सल्लयाविना उपयोग केला. कोरोना आजारात कफ जास्त प्रमाणात तयार होतो म्हणून स्वयंपाक घरातील अद्रक, लसून सारखे आयुर्वेदिक पदार्थ आरोग्यासाठी हितकारक म्हणून अतिप्रमाणात वापर केला. सध्या जनमाणसात आयुर्वेद विषयक असलेले समज-गैरसमज जी माझ्या निदर्शनात आली त्या बद्दल चर्चा करू.
१. आयुर्वेदिक औषधे उष्ण असतात.
उत्तर : अति प्रमाणात उष्ण गुण असलेले ज्वरग्नयोग किंवा लक्ष्मीनारायण यासारखी औषधे किंवा आहारात लसून, अद्रकचा अत्याधिक वापर घरातील सर्व सदस्यांनी केला तर काहींना त्याने बरे वाटले तर काहींना उष्ण वाटले. परंतु जर तुम्ही ही औषधी वैद्याच्या सल्लयाने घेतली तर योग्य व्यक्तीला योग्य ते औषध दिल्याने दुष्परिणाम शरीरावर दिसणार नाही. कफ प्रकृती असलेल्या व्यक्तीसाठी त्रिभुवनकीर्ति किंवा ज्वरग्नयोग सारखी औषधी उपयोगी पडेल. परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने त्याच आजारासाठी मुष्टासारखी औषधी किंवा उपरोक्त लक्ष्मीनारायण सारखी वनस्पती योग्य त्या द्रव्याबरोबर घेणे आवश्यक असते. त्यामुळे औषधे फार्मसी मधून न घेता वैद्यांच्या सल्लयानेच घ्यावी. कुठली औषधी किती कालावधीपर्यंत घ्यावी याचे ज्ञान केमिस्टला नसते. त्यामुळे औषधीने उपायाऐवजी अपाय होऊ शकतो.
२. आयुर्वेद औषधींवर पथ्य पाळावी लागतात.
उत्तर : आयुर्वेदिक विज्ञान रोगोत्पादक कारण विषयक माहिती घेऊन त्याच्या विपरीत औषधी योजना करून केली जाते. त्यामुळे ज्या आहार विहारामुळे तुम्हाला आजार होतो त्या आहारात बदल करणे आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपयुक्त असते. सतत इडली, दोसा, पोहा यासारखी अपचन करणारी पदार्थ खावून रोज अ‍ॅसिडिटीची गोळी घेणे ज्यामुळे काही कालावधीसाठी बरे वाटते, परंतु गोळीचा इतर अवयवांवर पुष्परिणाम होतो. त्यामुळे आहारात बदल करणे योग्य की अयोग्य हे तुम्ही ठरवा.
३. आयुर्वेदिक औषधी उशीरा गुण देतात
उत्तर : रात्री जागरण व उष्ण आहार यामुळे अल्पावधीत तीव्र शिरशुल असलेल्या व्यक्तीचे दुखणे ४-५ मिनिटांत गोळी न घेता रक्तमोक्षण चिकित्सेने बरा झाल्याचा माझा अनुभव आहे. परंतु सतत थंड-गरम विरुद्ध अन्न सेवन केल्याने निर्माण झालेला ग्रहणी सारखा आजार निर्माण होण्यास जेवढा अधिक कालावधी घेतो, त्याचप्रमाणे बरे होण्यासही अधिक कालावधी घेतो. मधुमेह, थायराईड, बीपी हे आजार अनेक वर्षाच्या हेतु सेवनाने निर्माण होतात. त्यामुळे या आजाराची चिकित्सा कालावधी दीर्घकालीन असते. त्याचप्रमाणे बरे होण्यास अधिक कालावधी घेतो. मधुमेह, थायराइड,बीपी हे आजार अनेक वर्षाच्या हेतु सेवनाने निर्माण होतात. त्यामुळे या आजाराची चिकित्सा कालावधी दिवसकालीन असतो.
४. आयुर्वेद चुर्ण, औषधी, तुप, तेल, आसव, अरिष्ट बराच काळ टिकतात. त्यास एक्सपायरी डेट नसते.
उत्तर : आयुर्वेदिक औषधी वीर्यवान म्हणजेच पोटेंटिअल असण्याचा कालावधी असतो. उदा. चुर्ण सहा महिन्यापर्यंत वापरणे (उत्पादन तारखेपासून) उपयुक्त असते. तर आसव किंवा अरिष्ट थोडे अधिक काळ टिकतात. औषधी तेल तुप लवकर खराब होते.
५. आयुर्वेदात शिसे, पारा सारखी हेवी मेटल्स वापरतात औषधी निर्माण करण्यारिता हे मेटल्स विषाक्त आहे म्हणून काही लोकांमध्ये औषधीबाबत संभ्रम आहे.
उत्तर : आयुर्वेदिक औषधी निर्माण करतांना या मेटल्सची शुद्धी करण्याची विशिष्ट पद्धत आहे. त्या प्रक्रियेने या धातुची विषाक्त नष्ट करून योग्य त्या गुणधर्र्माचा चिकित्सेसाठी उपयोग केला जातो. त्यामुळे औषधी शरिरासाठी उपकारक बनते.
६. आयुर्वेदिक औषधीस साइड इफेक्ट्स नसतात़ आयुर्वेदात 3 प्रकारची द्रव्ये (औषधी) वर्णित आहेत.
उत्तर : १. स्वस्थ व्यक्ती स्वास्थ्य टिकवून ठेवणारी,
२. शरीरातील बिघडलेली अवस्था समान ठेवणारी, (दोषाची समान व्यवस्था दोष शमन करून ठेवणारी)
३. शरीरातील दोष प्रकुपित करून बाहेर टाकणारी,
उदा. जमालगोटा सारखी औषधी द्रव्य असलेली वनस्पती त्वरीत विरेचन करते व थोडे जरी प्रमाणात जास्त सेवन केले तर अतिप्रमाणात मल बाहेर पडतो व शरीरास अपाय ठरतो. त्यामुळे औषधी घेताना वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा.
७. एखादी दुसरी औषधी वनस्पती टाकल्यास टूथपेस्ट किंवा साबण आयुर्वेद बनते.
उत्तर : आयुर्वेद टूथपेस्टकरिता अर्क, न्यग्रोध (वड), खदीर, करंज आदी वनस्पतीचे वर्णन आहे. त्यामुळे या वनस्पतीचा वापर केलेली कडू, तुरट, तिखट पेस्ट दातांसाठी योग्य असते.

मो क़्र- 9637976004