रा. तु. म. नागपूर विद्यापीठाद्वारे डॉ. तु वि. गेडाम D.Lit.(पंडित) या उपाधीने सन्मानित

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11345*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

353

रा. तु. म. नागपूर विद्यापीठाद्वारे डॉ. तु. वि. गेडाम D.Lit.(पंडित) या उपाधीने सन्मानित

-डॉ. तु. वि. गेडाम सरांचा आज ९८ वा वाढदिवस आणि ९८ व्या वर्षी डी.लिट.निमित्त अभिनंदनाचा वर्षाव

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर : एके काळी सर जॉन मॉरिस कॉलेज, नागपूर येथे इतिहासाचे प्राध्यापक म्हणून मोठया निष्ठेने अध्यापनाचे कार्य करणारे थोर इतिहासतज्ज्ञ, बिनीचे संशोधक, साक्षेपी विचारवंत, बुद्धिमान, व्यासंगी, ज्ञानोपासक, धर्मशील आणि समाजनिष्ठ व्यक्तिमत्त्व  डॉ. तु. वि. गेडाम यांनी १० जुलै रोजी  ९८ व्या वर्षात पदार्पण केले. नुकतेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १०८ व्या दीक्षांत समारंभात त्यांना डी.लिट. या उपाधीने सन्मानित करण्यात आले. वाढदिवसाचा व सन्मानाचा हा दिन जसा त्यांच्यासाठी, त्यांच्या कुटुंबीयांसाठी अत्युच्च सुखाची अनुभूती देणारा दिन आहे, तसाच तो त्यांच्या चाहत्यांसाठीसुद्धा आनंदोल्हासाची अनुभूती देणारा दिन आहे.

१० जुलै १९२४ साली चंद्रपूर जिल्ह्यातील तळोधी बाळापूर या छोट्याशा गावी अत्यंत गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. प्रथम तळोधी येथे त्यानंतर ब्रह्मपुरी येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते हायस्कूल व उच्च शिक्षणासाठी नागपूरला आले. १९४० साली तळोधी ते नागपूर असा १०५ किलोमीटरचा पायी प्रवास करीत त्यांनी वडिलांसोबत नागपूर गाठले.  येथील पटवर्धन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तेथून ते मॅट्रिक पास झाली १९५० साली नागपूर महाविद्यालयातून  इतिहास या विषयात एम. ए. झाले. प्रशासनात उच्चाधिकारी होण्याचे ध्येय उराशी बाळगून त्यांनी आय.ए.एस. व आय.ए.ए.एस. या परीक्षांचा जोमाने अभ्यास केला. त्यांनी १९५० साली आय.ए.एस. व १९५१ साली आय.ए.ए.एस या लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्या. मुलाखतीत त्यांना यश येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण राहिले.
अमर्याद ज्ञानलालसा बाळगणा-या तु. वि. गेडाम यांनी १९५२ ला  एलएल. बी., १९५३ साली एम. ए. (राज्यशास्त्र)  या पदव्या संपादित केल्या.दोन विषयांत एम. ए. होणारे ते त्या काळचे अस्पृश्य वगार्तील पहिले विद्यार्थी होते. ‘अस्पृश्यता व तिचे मूळ’ या विषयावर त्यांनी पीएचडीसाठी इंग्रजीत शोधनिबंध लिहिला व आचार्य पदवी प्राप्त केली. १९५७ त्यांनी इतिहासाचे प्राध्यापक म्हणून नागपूर महाविद्यालय, नागपूर (जुने मॉरिस कॉलेज आताचे वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था) येथे अध्यापन कायार्ला प्रारंभ केला. याच महाविद्यालयातून ते १९८२ निवृत्त झाले.
रावसाहेब ठवरे, नाशिकराव तिरपुडे, डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते, ग. त्र्यं. माडखोलकर, शरच्चंद्र मुक्तिबोध, किसन फागुजी बनसोड, ना. रा. शेंडे, डॉ.गंगाधर पानतावणे, डॉक्टर गो. ब. देगलूरकर, डॉ. उषा  देशमुख डॉ. भाऊ लोखंडे यांसारख्या दिग्गज समकालीन आमच्या सहवासात त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले. निवृत्तीनंतरही त्यांनी शिक्षण आणि समाज कार्य सुरूच ठेवले.
डॉ. गेडाम यांनी ऐन तारुण्यातच स्वत:ला समाजकार्यात झोकून दिले होते.शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून अनेक आंदोलने त्यांनी लढविली. १९४७ साली नागपूर येथील कस्तुरचंद पार्कवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटवर्तीय श्री जोगेंद्रनाथ मंडल यांच्या अध्यक्षतेत त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्य विद्यार्थी संघाच्या परिषदेचे यशस्वी आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्याची, त्यांचे मार्गदर्शन घेण्याची संधीही त्यांच्या जीवनात त्यांना लाभली. आजही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते समाजहितासाठी लेखन करीत आहेत. ‘निष्काम कर्मयोगी’, ‘अस्पृश्यता व तिचे मूळ’ ‘चातुर्वर्ण्य व्यवस्था व दहशतवाद’, ‘कथा आरक्षणाची व्यवस्था वंचितांची’, ‘शूद्र इत्यादी मूलभूत स्वरूपाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. तसेच ‘स्वाभिमान’,  ‘परिवर्तन ‘, ‘केशर’ हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. त्यांच्या साहित्यकृतीतील विचार अत्यंत चिंतनीय स्वरूपाचा आहे. अस्पृश्यता व तिचे मूळ हा त्यांचा ग्रंथ मुळात पीएचडीचा प्रबंध असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रस्तुत ग्रंथ त्यांनी अर्पण केला आहे.या ग्रंथातील अर्पणपत्रिका वाचल्यानंतर डॉ. आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात असलेले अगाध प्रेम आणि प्रस्तुत ग्रंथाची दिशा आपणास सूचित होते. वयाच्या ९८ व्या वर्षी ‘शूद्र’ या त्यांच्या प्रबंधाला नागपूर विद्यापीठातून डीलिट मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद दुर्मीळ अशी घटना आहे.
इतके सगळे त्यांच्याकडे असूनही समाजापासून आणि माध्यमांपासून ते अलक्षितच राहिलेत. ते स्वत: कधीही प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत. अत्यंत अभावग्रस्त परिस्थितीतून त्यांनी स्वत:चं असामान्यत्व सिद्ध केलं, परंतु त्यांनी कधीही आपल्या दु:खाचे भांडवल केले नाही.  जे जे शक्य होईल ते कार्य ते करीत गेले आणि या वयातही ते करीत आहेत. तारुण्याला लाजविणारी त्यांची ही ऊर्जा केवळ अभिनंदनीयच नाही तर ती खरोखरच अनुकरणीय अशी आहे. आयुष्यभर अत्यंत साधे जीवन जगणा?्या  या  नि:स्पृह, निर्लेप, निराभिलाषी साध्या सरळ  ज्ञानवंताला ९८ व्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…९८ व्या वर्षी नागपूर विद्यापीठाने द्वारे डिलीट ही उपाधी प्राप्त केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन…