लोकसंख्या शिक्षण काळाची गरज-डॉ.वर्षा गंगणे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11281*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

677

११ जुलै : जागतिक लोकसंख्या दिन,
विदर्भ वतन विशेष

लोकसंख्या शिक्षण काळाची गरज

   भारताच्या अनेक समस्यांचे मूळ असलेली समस्या  म्हणजे निरंतर वाढत असलेली लोकसंख्या होय.लोकसंख्या नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना पुरेश्या नसल्यामुळे तसेच अयशस्वी ठरल्याने लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरणाला अपयश आले.आज तर चीन च्याही पुढे भारत लोकसंख्येच्या बाबतीत जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
      वाढती लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी ‘लोकसंख्या शिक्षण’ आज काळाची गरज आहे.लोकांमध्ये जागरूकता येणे गरजेचे आहे.थोडक्यात वाढत्या लोकसंख्येच्या प्रश्नाविषयी जागरूकता आणण्यासाठी ‘लोकसंख्या शिक्षण’ही संकल्पना आवश्यक आहे. सामान्य शिक्षण किंवा साक्षरता या संकल्पनेपेक्षा  लोकसंख्या शिक्षण ही संकल्पना वेगळी व नविन आहे.
     भारतात ‘लोकसंख्या शिक्षण’ही संकल्पना 1980 सालानंतर आली व 1990 पर्यंत ती देशातील शालेय विद्यालयात पाठयांश म्हणून रुजली. वर्तमान काळात सर्वच शैक्षणिक स्तरावर लोकसंख्या शिक्षण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक शास्त्रांप्रमाणे विज्ञान शाखा आणि भाषा विषयातून देखील लोकसंख्या शिक्षणाचा आशय भावी पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज आहे .
लोकसंख्या शिक्षण म्हणजे काय ?
लोकसंख्या शिक्षण म्हणजे असे अध्ययन ,ज्यात शिक्षणार्थींना गर्भधारणा,जनन,मृत्यू इत्यादींसंबंधी मूलभूत माहिती दिली जाते. तसेच निरनिराळ्या वयोगटातील  विद्यार्थ्याना कसे आणि किती लैंगिक शिक्षण दिले जावे याचा विचार केला जातो.मानवी जीवनाची वास्तविकता आणि वैयक्तिक स्वच्छता याविषयीची माहिती दिली जाते. लोकसंख्या शिक्षणात लोकसंख्येच्या साक्षरतेचा किंवा सर्वसामान्य शैक्षणिक स्तरांचा विचार केला जात नाही.ते एकूण शिक्षणाचा एक भाग असते. ‘लोकसंख्या शिक्षित करणे’आणि ‘लोकसंख्या शिक्षण देणे ‘ या दोन्ही संकल्पना पूर्णतः भिन्न आहेत . म्हणूनच लोकसंख्या शिक्षणाचे नियोजन वेगळ्या पद्धतीने करावे लागते.
     लोकसंख्या शिक्षणाचा आशय विद्यार्थ्याच्या प्रत्येक पिढीबरोबर बदलू शकतो तसेच प्राथमिक,माध्यमिक व उच्च शिक्षण या निरनिराळ्या पातळ्यांवर लोक शिक्षणाचा अभ्यासक्रम पाठयांशाचा आशय निराळा असतो.वैद्यकीय अभ्यासक्रमात मात्र तो सर्वस्पर्शी स्वरूपाचा असतो.
      शिक्षणाच्या निरनिराळ्या पातळ्यांवर अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने प्रत्येक पातळीस लोकसंख्याशास्त्र आणि लोकसंख्या अध्ययनाच्या  पाठयांशाचे शिक्षण देणे म्हणजे लोकसंख्या शिक्षण होय.यातील लैंगिक शिक्षणाच्या भागास पालकांचा विरोध झाल्यास पालकांनाही लोकसंख्या शिक्षणाची गरज आहे असे समजावे.
     लोकसंख्या शिक्षणाचा आ शय देश, काळ आणि परिस्थिती नुसार वेगवेगळा असतो . उदा.जर फ्रान्समध्ये लोकसंख्या शिक्षण द्यायचे असेल तर घटत्या लोकसंख्येच्या समस्यांची जाणीव शिक्षणार्थींना करून द्यावी लागेल. तर भारतात लोकसंख्या शिक्षणा अंतर्गत लोकसंख्या विस्फोट, लैंगिक विषमता, आरोग्यावरील परिणाम,वाढता जन्मदर व त्याचे परिणाम, जवाबदार पालकत्व यासारख्या अभ्यासक्रमावर भर द्यावा लागेल.
    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे पण त्याची फळे भारतीय जनता पूर्णपणे उपभोगू शकली नाही. कारण वाढती लोकसंख्या आर्थिक व तांत्रिक प्रगती बऱ्याच प्रमाणात गिळंकृत करून टाकते. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण लावणारे आणि त्याचबरोबर लोकसंख्येची गुणवत्ता वाढीस लावणारे लोकसंख्या शिक्षण आज काळाची गरज आहे. लोकसंख्येच्या समस्येकडे केवळ जनतेच्या दृष्टीकोनातून पाहणे पुरेसे नाही .याव्यतिरिक्त लोकसंख्येशी संबंधित असलेले इतर घटक जसे उपलब्ध साधन संपत्ती व तिचा प्रत्यक्ष वापर,देशातील तंत्रज्ञान, औद्योगिक व आर्थिक प्रगतीचा वेग ,देशाचा सामाजिक व सांस्कृतिक विकास, लोकांच्या राहणीमानाची पातळी ,पर्यावरणाचा समतोल ,यासंदर्भात लोकसंख्या समस्यांची जाण लोकसंख्या शिक्षणातून निर्माण केली जाते.
     थोडक्यात लोकसंख्या शिक्षणातून लोकसंख्येच्या विविध समस्यांना विचारात घेऊन त्यावर प्रकाश टाकण्याचा अभ्यासपूर्ण प्रयन्त होणे अपेक्षित आहे. ‘एक कुटुंब एक अपत्य’ संकल्पना राबवून चीनने लोकसंख्या नियंत्रित केली आहे. पण भारतासारख्या लोकशाही राज्यव्यवस्था असलेल्या देशात असे कठोर नियम व कायदे लावता येत नाहीत. सामान्य लोकांच्या मनात अजूनही लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम आणि त्यांचे गांभीर्य याची जाणीव नाही.भारतात अनेक जाती,धर्म,पंथ व वंशाचे लोक राहतात.प्रत्येकाची विचारसरणी व परंपरा वेगळ्या आहेत. काही जाती -धर्मात आपली संख्या वाढविण्यासाठी  आपल्या कुटुंबाचा आकार वाढवितात. ग्रामीण भागात तर जेवढे हात अधिक तेवढे कमावणारे उत्पन्न अधिक अशी समजूत आहे. भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ या समजुतीतुन कुटुंबाचा आकार वाढत जातो.सुशिक्षित लोकही याला अपवाद नाहीत. शहरी भागात शिक्षण,राहणीमानाचा उच्च स्तर  व त्याचे महत्व लक्षात आल्यामुळे कुटुंबाचा आकार बराच सीमित झाला आहे. पण त्यामुळे देशात एक अनोखी विषमता निर्माण झाली आहे . सधन कुटुंबाचा आकार लहान तर निर्धन कुटुंबाचा आकार वाढला आहे. परिणामी गरिबी व दारिद्र्य वाढले आहे.याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारताचा विकास अजूनही थांबलेला आहे.शाश्वत विकासासाठी लोकसंख्या नियंत्रीत असणे आवश्यक आहे
 व त्यासाठी लोकसंख्या शिक्षणाची गरज आहे.अन्यथा प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ नर्क्स ने म्हंटल्याप्रमाणे “India Is Poor Because It Is Poor “याची प्रचिती दीर्घकाळपर्यंत वारंवार येत राहील .वर्तमान काळात लोकसंख्या शिक्षण अभ्यासक्रमात स्वतंत्र व आवश्यक विषय घोषित करून तो लागू करण्यात यावा असे प्रकर्षाने नमूद करावेसे  वाटते.

डॉ.वर्षा गंगणे

त्रिमूर्ती नगर देवरी
जिल्हा गोंदिया
441901
मोबा – 9422134807