
आंदोलनाच्या नव्हे तर, बाजारातील गर्दीने होतो कोरोना?
अजय बिवडे – संपादक, विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – एकीकडे राज्य सरकार कोरोना रोगाप्रती जनजागृती करीत आहे़ यात सोशल डिस्टन्सिंग पाळा, बाजारात गर्दी करू नका, सांस्कृतिक समारंभ मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडा तसेच अंत्ययात्रेला ५० लोकांची उपस्थिती हा नियम नागरिकांना पटवून देत आहे़ त्यामुळे बाजारपेठाही ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे़ उपद्रव शोध पथक प्रतिष्ठानांमध्ये, मास्क न घालणाºयांवर, बाजारांमध्ये व समारंभामध्ये भेट देवून नियम मोडणाºयांवर कारवाई करीत आहे़ तशी कारवाई झाल्याचे वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते़ मात्र कोरोना फक्त सामान्य नागरिकांच्या माध्यमातूनच पसरतो हे शासनाला किंवा राजनेत्यांना दाखवायचे आहे काय? असाही प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित होतो़
कोरोनाची दुसरी लाट पुन्हा येणार की, तिसरी लाट येणार? त्यामुळे शासनासह आरोग्य विभाग सजग आहे़ अशातच राज्यभर सुरू असलेल्या राजकिय पक्षांच्या आंदोलनांच्या फैरींनी सारेच काही स्पष्ट होते़ ओबीसींच्या राजकिय आरक्षणासंदर्भात भाजपने आंदोलन केले़ तर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसने आंदोलन पुकारले़ पावसाळी अधिवेशनात बेशीस्ती प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षाकरिता निलंबित केल्यानंतर भाजपच्यावतीने राज्य शासनाचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आंदोलन करण्यात आले़ काँग्रेसच्या महिला विभागातर्फे सुद्धा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महागाईविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले़ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात तसेच केंद्र शासनाचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले़ अजनी वन संपत्ती तोडण्याच्या विरोधात शिवसेनेच्याहीवतीने आंदोलन पार पडले़
या संपुर्ण सर्वपक्षीय आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पहायला मिळाली़ यादरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्तही होता़ मात्र, अशा राजकिय गर्दीला कुणाचीही भिती नव्हती़ यादरम्यान कुणाला दंडही ठोठावण्यात आलेला नाही़ म्हणजे आंदोलनाच्या नव्हे तर बाजारातील गर्दीने कोरोना होतो असे म्हणावे का? नियम हा सर्वांनाच एकसमान असायला हवा़ हाच विसर नेमका शासनाला किंवा मनपा प्रशासनाला पडलेला दिसत आहे़ ‘गर्दी करू नका’ हा सल्ला देणारेच आपल्या मागण्यांसाठी असंख्य गर्दीने आंदोलने करतात ही शोकांतिका आहे़ नागरिकांना घरी राहण्यासाठी प्रोत्साहित करणारेच आज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आहे आणि याची दखलही जनता घेत आहे़
ही गर्दी आणि आंदोलने मनपा निवडणुकीची तयारी म्हणावी का?
निवडणुकांची आखणी बघितली तर, इच्छुक उमेदवार हे सामाजिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली ‘इमेज’ सर्वसामान्यांमध्ये ‘हिट’ करण्याचा प्रयत्न करतात़ यासोबतच नागरिकांशी ‘कट्टयावरील चर्चा’ करतात़ मात्र यंदा दिडवर्षांपासूनच्या कोरोनामुळे या सर्व कार्यक्रमांवर बंदी आलेली आहे़ अनेक उत्सवांवरही विरजन पडलेले आहे़मंदिरे व धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे तेथील कार्यक्रमांच्या आयोजनालाही सक्ती आहे़ मनपा निवडणुकीच्या माध्यमातून नगरसेवक होण्याची स्वप्ने पाहणारे ‘भाऊ-दादा’ आता सोशल मिडीयाच्या तसेच बँनरवरील जाहिरातींच्या माध्यमातून आपले समाधान ‘तुपावरचे तेलावर’ याप्रमाणे भागवत आहे़ आम्हीच कसे आपल्या भागाचे सर्वेसर्वा हेच पक्षश्रेष्ठींना दाखवून देण्याचा प्रयत्न करीत आहे़ यामुळे पक्षाची आंदोलने आली की, आपल्या भागातील कार्यकर्त्यांसह सहभाग नोंदविणे व त्याची छायाचित्रे सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसारित करण्याचे प्रमाण काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सर्वांच्या निदर्शनात येतेही़ ‘ ऐ भावा आपलीच हवा’ असे म्हणणारे कार्यकर्तेही इच्छुकांच्या पाठीशी आहेच़ याच सर्व वातावरणांमध्ये ‘निवडणुकांच्या पुर्वतयारीचे’ बिगुल वाजले असे म्हणणे वावगे ठरणार नाही़ ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या गटातील कार्यकर्त्यांना ‘कामाला लागा’ असा इशाराही दिल्याचे लक्षात येते़ यासोबतच ‘आपली तिकीट पक्की आहे’ असे म्हणणारे आवाजरूपी वारेही फिरत आहे़ राजकारण हा विषय तसा प्रत्येकाच्या आवडीचा़ एक किस्सा निघाला की, पुढे उभा राहणाºयाकडे दुसरा किस्सा असतोच़ निवडणुकीसंदर्भात आता असेच काहीशी चर्चाही सुरू झालेली आहे़ त्यामुळे मिळेल त्या प्रकारे इच्छुकांनी आपले समाजकार्य सुरू केले आहे़ कोरोना रोगामुळे काही प्रमाणात बंधने येत असली तरी, खुर्चीचा मोह सुटणार नाही़

