
नातूने गळा चिरून केली आजीची हत्या
विदर्भ वतन, चांदूरबाजार : तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी येथे नातवानेच ७५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यावर धारदार शस्त्राने घाव करून हत्या केली. ही घटना गावातील गंगामाई मंदिराजवळ वृद्धेच्या राहत्या घरी, गुरुवार ८ जुलैला सकाळी ९ ते ९.३0 दरम्यान घडली. मृतक वृद्ध महिला गंगामाई मंदिरात जवळील भोईपु-यातील रहिवाशी असून, तिचे नाव गिरजा अण्णाजी आमझरे असल्याचे पोलिसांच्या माहितीवरून कळते. सदर वृद्ध महिलेच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली. प्रथम पाहणीच्या वेळी वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची पोथ दिसून न आल्यामुळे वृध्देचा लुटण्याच्या उद्देशाने हत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतकेचा मुलगा लक्ष्मण आमझरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार मृत वृद्धा आपल्या पतीसोबत राहत होती. तिला दोन मुले व दोन मुली आहेत. पैकी दोन मुलं व एक मुलगी मृतकेच्या शेजारीच जवळपास राहतात. तर मृतक महिला व तिचे पती मुलांपासून वेगळे राहत होते. घटनेच्या दिवशी मृतकेचे पती सकाळी ९ वाजता गावात घरा जवळच राहत असलेली मुलगी व जावई यांचे कडे कामानिमित्त गेले होते. त्यांना तेथून चहा घेऊन यायला अंदाजे अधार्तास लागला असावा. या अर्धा तासांचे दरम्यान ही घटना घडली आहे. पती मुलीच्या घरी गेल्यामुळे घटनेच्या वेळी मृतक वृद्ध महिला घरात एकटीच होती. याचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने आपला डाव साधला व फरार झाले. यादरम्यान मृतकेचे पती बाहेरून घरी आले असता त्यांना आपली पत्नी खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. अण्णाजी यांनी घाबरून जाऊन शेजारीच राहणा-या आपल्या दोन्ही मुलांना जोराने आवाज दिले. त्याच्या आवाजाने दोन्ही मुले धावतच वडीलांचे घरी गेले. तेव्हा त्यांना आपली आई खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेली दिसून आली. घटनेचे गांभीर्य ओळखून मृतकेच्या मुलांनी पोलिसात माहिती दिली. स्थानिक पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यादरम्यान गावातील नागरिक घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनी प्राथमिक माहिती घेऊन मृतकेला उपचारासाठी चांदूरबाजार ग्रामिण रूग्णालयात पाठविले. सदर वृद्ध महिलेची गंभीर स्थिती पाहता तिला तातडीने उपचारासाठी अमरावती येथे पाठविण्यात आले. परंतु चांदूरबाजार-अमरावती दरम्यान मध्येच महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतकेला परत चांदूरबाजार ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अमरावती गुन्हे शाखेच्या, पोलिस अधिकारी यांनी ब्राम्हणवाडा थडी येथे धाव घेतली. गुरवारी गावातच तळ ठोकून,स्थानिक पोलिसांच्या मदतीने तपास सुरू केला. घटनेची वेळ व हत्येच्या वेळी ,थोडीही आरडाओरडा न होणे. यावरून हत्यारा हा परिचीत किंवा घरातीलच असावा असा पोलिसांचा कयास होता. त्यावरून तपास करून शुक्रवारी ९ जुलैला सकाळी पोलिसांनी मृतकेचा नातू सुरेश आमझरे वय वर्षे २९ याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासाच्या प्राथमिक अंदाजानुसार नातवानेच पैसासाठी आजीचा घात केल्याचे कळते. पुढील तपास ब्राम्हणवाडा थडी पोलिस करीत आहेत.

