
नागपुरात इंधन दरवाढीविरोधात भरपावसात काँग्रेसचा सायकल मोर्चा
विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर – इंधन दरवाढीच्या विरोधात आज गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नागपूर येथील संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान मुसळधार पाऊस कोसळला. या पावसाची पर्वा न करता नाना पटोले यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. देशातील जनता महागाईच्या आगडोंबात होरपळत असताना केंद्र सरकार आणखी महागाई भडकवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.
गेल्या सात वर्षांपासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे. मात्र, सत्तेचा आनंद उपभोगताना देशातील जनतेसमोर काय समस्या आहेत याची जाणीव या सरकारला नाही, कोरोना महामारीच्या संकटात गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांसमोर आर्थिक संकट उभे आहे. मात्र, अशा संकटात पेट्रोल डिझेलसह घरगुती वापरातील गॅसचे दर प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून देशात महागाई भडकवण्याचे काम होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केला आहे. दरम्यान इंधनाचे दर सतत वाढत असल्याने पेट्रोलचे दर १०५ रुपये प्रति लिटरच्या पुढे गेले. तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. गॅस सिलेंडर तर नऊशे रुपयांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे काँग्रेस देशाभरात आंदोलन करत आहे.

