अनिल निधानच भाजपचे उमेदवार: योगेश डाफ, कैलास महल्ले अर्ज घेतील मागे

160

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – नागपुरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून मातब्बरांनी अर्जही दाखल केले आहे. परंतु भाजपचा गड असलेल्या कामठी विधानसभा क्षेत्रातील गुमथळा जि.प. सर्कलमधून भाजपचा उमेदवार रिंगणात राहणार नाही. या सर्कलमधून यापूर्वी निवडणूक लढलेल्या अनिल निधान यांनी पूर्वी नकार देत उमेदवारी घेतली नाही. नंतर मात्र, अपक्षरित्या अर्ज दाखल केल्याने भाजपला आपल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज मागे घेत अनिल निधान यांना सर्मथित उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा लागत आहे.
कामठी विधानसभा मतदार संघ हा भाजपचा बालेकिल्ला मानल्या जातो. येथून माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनमुळे हे सलग तिनदा विधानसभेवर पोहचले. तर गत विधानसभा निवडणुकीत भाजपकडून वेळेवर त्यांच्या जागी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी दिल्यानंतरही तेही तेथून विजयी झाले. विशेष म्हणजे, बावनकुळे हे याच मतदार संघात वास्तव्यास असून, तेथे त्यांचा दबदबाही चांगलाच आहे. गत जि.प. निवडणुकीतही अनिल निधान हेच गुमथळ्यातून १३०० हून अधिक मताधिक्क्याने विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी जि.प. मध्ये एक आक्रामक विरोधी पक्षनेता म्हणून चांगले कामही पाहिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. त्यामुळे या निवडणुकीत त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित होते. परंतु ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारत योगेश डाफ यांचे नाव समोर केले. प्रथम निधान यांनी दुसºयास संधी देण्यासाठी निवडणूक लढत नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु नंतर अनिल निधान यांनीही अर्ज दाखल केला. डाफ यांच्या अर्जासोबत पक्षाचा अधिकृत ‘बी’ फॉर्म नव्हता. त्यानंतर पक्षाने तिकीट नाकारल्याने निधान यांनी बंडखोरी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. यामुळे कार्यकर्ते नाराज झाल्याचे सांगण्यात येते. याचा फटका बसण्याची शक्यता असल्याने पक्षाने भूमिका बदलली.