पोलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू : तीन जिल्ह्यातील पोलिसताफा तैनात

250

विदर्भ वतन न्युज पोर्टल, लंकेश इंगळे, यवतमाळ – दारव्हा येथे रस्त्यावर गोंधळ घालणाºया तिघांना पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतले. यातील एकाचा पोलीस ठाण्यात मृत्यू झाला. त्यानंतर रात्री जमावाने दारव्हा पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करीत पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. यानंतर दारव्हा शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल दाखल झाले. पोलीस ठाण्यात मृत्यू झालेल्या युवकाचे शव बुधवारी सकाळी वैद्यकीय चिकत्साकरिता यवतमाळात आणण्यात आले. खबरदारी म्हणून शवविच्छेदनगृह व यवतमाळ शहरातील प्रमुख कार्यालयाभोवताली कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. दारव्हा येथे पोलीस ठाण्यावर दगडफेक झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यातून कुमक दारव्हा येथे पाठविण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे मंगळवारी रात्रीपासून दारव्हा पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत. मृतक शेख इमरान शेख शब्बीर (३०), रा. रेल्वे स्टेशन परिसर, दारव्हा यांचा मृतदेह यवतमाळात वैद्यकीय चिकत्सेकरिता आणण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शवविच्छेदनगृहात इन कॅमेरा चिकित्सा करण्यात आली. यावेळी मृताचा भाऊ शेख जाबीर शेख शब्बीर यांच्यासह काही नातेवाईक उपस्थित होते. खबरदारी म्हणून जिल्हाधिकाºयांचे शासकीय निवासस्थान, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस ठाण्यात युवकाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दारव्हाचे पडसाद यवतमाळात उमटू नयेत यासाठी पोलिसांनी सर्वच प्रमुख कार्यालयांसमोर बंदोबस्त लावला होता.