
विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मूक आंदोलन केले. त्यावेळी सरकारने सकारात्मकता दाखवल्यामुळे आंदोलनाला स्थगिती दिली. मात्र, सरकारने दिलेली मुदत आता संपली असून अधिवेशनात काही ठोस निर्णय न झाल्यास पुन्हा एकदा मूक आंदोलन सुरू करण्यात येईल,असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सोमवारी सरकारला दिला.
संभाजीराजे छत्रपती सध्या राज्याच्या दौºयावर आहेत. या अंतर्गत सोमवारी त्यांनी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनतेशी संवाद साधला. तसेच पत्रकारांशी बातचीत केली. याप्रसंगी ते म्हणाले, कोरोनाकाळात जनतेला रस्त्यावर येण्यास भाग पाडणे योग्य नाही. ठोक मोर्चा, हल्लाबोल मोर्चा काढता येऊ शकतो. लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरता येईल. परंतु, आता परिस्थिती तशी नाही. यापूर्वी झालेल्या मूक आंदोलनामध्ये मराठा बांधव एकत्र आले. समाजाने आरक्षणाची भूमिका मांडली आहे. ७० टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांच्या मागणीला लोकप्रतिनिधींनी पुढे नेण्याची गरज आहे. समाजाला दिशाहीन होऊ न देता त्यांना योग्य मार्ग दाखविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आहे. याप्रसंगी श्रीमंत डॉ. राजे मुधोजी भोसले, श्रीमंत राजे संग्रामसिंह भोसले उपस्थित होते.
स्वप्नील लोणकर या युवकाच्या आत्महत्येमुळे लोकसेवा आयोगातील प्रलंबित नियुक्त्यांचा मुद्दा पुढे आला आहे. एकीकडे सरकारी नोकºयांसाठी जागा नाही म्हणून ओरड होत असताना दुसरीकडे उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती होत नसेल तर या परीक्षा घेता कशाला, असा सवाल संभाजीराजे छत्रपतींनी उपस्थित केला. माओवाद्यांनी लोकशाही स्वीकारत मुख्य प्रवाहात यायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कायदा हातात घेण्याची शिकवण दिली नाही. माओवाद्यांना शिवाजी महाराजांचे पाईक व्हायचे असेल असेल तर त्यांनी कायदा पाळायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले़ याचप्रमाणे सारथी संस्थेला १ हजार कोटी द्या, अण्णासाहेब महामंडळांची मर्यादा वाढवा, मराठा-कुणबी समाजाचे वसतिगृह तयार करा, ओबीसींप्रमाणे मराठ्यांना शैक्षणिक सवलत द्या तसेच मराठा तरुणांवरील गुन्हे मागे घ्या अशा मागण्याही त्यांनी शासनाकडे केल्या आहे़

