Home Breaking News सावधान! अंटार्क्टिकावर उष्णतेने मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम

सावधान! अंटार्क्टिकावर उष्णतेने मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10914*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

38 views
0

सावधान! अंटार्क्टिकावर उष्णतेने मोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : न्यूयॉर्क – जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक असलेल्या अंटार्क्टिकावरील उष्णतेने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. कॅनडा आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये उष्ण वातावरणामुळे चिंता व्यक्त केली जात असताना जगातील सर्वाधिक कमी तापमान असणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. मागील वर्षी अंटार्क्टिका खंडावर १८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्याला आता संयुक्त राष्ट्र संघानेही दुजोरा दिला आहे.

युनायटेड नेशन्सच्या जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस पेटारी ताल्स यांनी सांगितले की, उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याने त्या ठिकाणचे वातावरण आणि हवामान बदलाबाबतच्या अभ्यासासाठी त्याची मदत होते. पृथ्वीवर तापमान वाढीचा वेग अधिक असलेल्या ठिकाणांपैकी अंटार्क्टिका एक ठिकाण आहे. या ठिकाणी मागील ५० वर्षात ३ अंश सेल्सिअस वाढले आहे. हवामान बदलासोबत तापमान वाढत असून आम्ही निरीक्षण करत असल्याचे त्यांनी सांगितले. सेमूर बेटांचे तापमान २०.७५ इतके नोंदवले गेले असा ब्राझीलचा दावा संयुक्त राष्ट्र संघटनेने फेटाळून लावला. यापूर्वी, अंटार्क्टिकामध्ये सन २०१५ मध्ये कमाल पारा १७.५ डिग्री सेल्सियस नोंदविला गेला होता. उष्ण तापमानाचे संकेत मिळाल्यानंतर शास्त्रज्ञांनी या भागातील हवामानाचा अभ्यास केला. उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने उष्णता वाढली असल्याचे त्यांनी म्हटले.

अंटार्क्टिकावरील तापमान हे पृथ्वीच्या इतर ठिकाणांपेक्षा अधिक वेगाने वाढत असल्याचा इशारा नॅशनल स्नो एण्ड आइस डेटा सेंटरने दिला. अंटार्क्टिकामधील बर्फ वितळल्यास जगभरातील समुद्राची पातळी २०० फूट वाढू शकते. नेचर या नियतकालिकेच्या माहितीनुसार, वर्ष १८८० नंतर समुद्राच्या जलस्तरात सरासरी ९ इंचाने वाढ झाली आहे. यातील एक तृतीयांश जलस्तर ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामधील बर्फ वितळण्यामुळे वाढला आहे. समुद्राचा जलस्तर वाढल्यास किनारपट्टीवरील शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका याआधीच शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.