
उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्करसिंह धामी यांची निवड
विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : डेहराडून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी काल रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. त्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सवार्र्ंचे लक्ष लागले होते. अखेर आज भाजपा आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी खटीमा विधानसभा मतदारसंघाचे आमदार पुष्करसिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या रविवारी राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून धामी हे पदाची शपथ घेणार आहेत.
तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर आज दुपारी तीन वाजता नूतन मुख्यमंत्री पदी निवड करण्यासाठी डेहराडूनमध्ये भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ दलाची एक बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदी पुष्कर सिंह धामी यांची एकमताने निवड करण्यात आली. तीरथ सिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवला. त्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक यांनी अनुमोदन दिले. यावेळी, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, भाजप महासचिव डी. पुरंदेश्वरी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. तसेच प्रभारी दुष्यंत गौतम आणि सह प्रभारी रेखा वर्मा हेदेखील या बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर पुष्करसिंह धामी म्हणाले की, माझ्या पक्षाने एका सामान्य कार्यकर्त्याला, माजी सैनिकाच्या मुलाला ज्याचा जन्म पिथौरगड येथे झाला त्याला राज्याची सेवा करण्यासाठी नेमले आहे. आम्ही जनतेच्या कल्याणासाठी एकत्र काम करू. कमी कालावधीतही मी इतरांच्या सहकार्याने जनतेची सेवा करण्याचे आव्हान स्वीकरत आहे. तर भाजपाचे खासदार अजय भट्ट यांनी म्हटले की, आम्ही या निर्णयाबद्दल आनंदी आहोत. आम्हाला तरूण नेतृत्व मिळाले आहे. आम्ही 2022 मधील विधानसभा निवडणूक मोठ्या बहुमताने जिंकू.

