
ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने बजावला समन्स
-अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू असतानाच आता त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारीच ईडीने ऋषिकेश देशमुख यांना समन्स पाठवला होता. यामध्ये चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहे. यावरुन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाल्याची दिसत आहे. 100 कोटी वसुली प्रकरण त्यांना भोवलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोप केला. याप्रकरणी बार मालकांनी दिलेला जबाब तसेच सचिन वाझे याच्या जबाबानंतर ईडीने अनिल देशमुखांच्या निकटवर्थींना अटक केली आहे.
ऋषिकेश देशमुख अडचणीत?
ईडीच्या वकिलांनी न्यायालयात जे मुद्दे मांडले त्यानुसार अनिल देशमुख यांना 4 कोटी 70 लाख रुपये बार सुरू ठेवण्यासाठी मिळाले आणि त्यांनी हा पैसा ऋषिकेश देशमुख यांना दिला. जेणेकरुन दिल्लीतील पेपर कंपनींच्या माध्यमातून हा पैसा पुन्हा श्री साई शिक्षण संस्थेकडे दानच्या माध्यमातून आला. या गुन्ह्यांत परदेशी व्यक्तींचा सहभाग नाकारतां येत नाही.
हवाला मार्फत पैशांचा व्यवहार?
एका गुप्त व्यक्तीच्या जबाबात असं सांगण्यात आलंय की, ऋषिकेश देशमुख एका अशा व्यक्तीच्या शोधात होता जो रोख रक्कम घेवून ट्रस्ट मध्ये दान करेल. नागपुरहून कॅश हवालाच्या माध्यमातून दिल्लीला पाठवली जायची आणि ऋषिकेश देशमुख याची सर्व व्यवस्था पहायचा.

