अखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर! 30:30:40 असा फॉर्म्युला

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10852*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

146

अखेर बारावीच्या निकालासाठी मूल्यमापन पद्धत जाहीर! 30:30:40 असा फॉर्म्युला

 

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : मुंबई – मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे देशातील शिक्षण क्षेत्रात अमूलाग्र बदल झाला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता लक्षात घेऊन यंदा बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुल्यमापन प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार राज्यातील बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सीबीएसई प्रमाणेच 30:30:40 या सूत्रावर आधारित विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणार आहे. यामध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (30%), अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (30%) व इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण (40%) असे गुण एकत्र करून बारावीचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

निकाल तयार करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाकडून प्राचार्यांसह 7 सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांचे या उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झाल्यास कोविड-19ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या लगतच्या परीक्षांमध्ये श्रेणीसुधार योजनेअंतर्गत लागू होणाऱ्या एक किंवा दोन संधी उपलब्ध असतील. दरम्यान, कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी (दिव्यांग विद्यार्थ्यांसहित) ऑनलाईन, दूरध्वनीद्वारे एकास एक वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन करून नोंदी करून गुण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य मंडळाने 31 जुलैपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे.