मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था : लखनऊ – मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे आज पहाटे ४.३० वाजता निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. टंडन यांचा मुलगा आशुतोष याने ट्विटरवरून त्यांच्या निधनाबाबत माहिती दिली आहे. लालजी टंडन यांना मागील आठवड्यात लखनऊच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते व्हेंटिलेटरवर होते.

लालजी टंडन यांचे अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं फुप्फुस, किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हते. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली होती, असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

शासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याने, तसेच तापामुळे लालजी टंडन यांना सर्वप्रथम ११ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘लालजी टंडन यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, तसेच त्यांचे डायलासिस सुरु होते’, असे रुग्णालयाकडून सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल करताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली होती.

You missed